गणेश विसर्जनासाठी पोलीस, पालिका यंत्रणा झाली सज्ज; चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:28 PM2019-09-11T23:28:42+5:302019-09-11T23:28:50+5:30

स्टॉलवरील कारवाईबाबत चालढकल

Police, municipal machinery ready for Ganesh immersion; Adjustment of accuracy | गणेश विसर्जनासाठी पोलीस, पालिका यंत्रणा झाली सज्ज; चोख बंदोबस्त

गणेश विसर्जनासाठी पोलीस, पालिका यंत्रणा झाली सज्ज; चोख बंदोबस्त

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाची पोलीस आणि महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. ५०० पेक्षा जास्त पोलीस, तर १४० सार्वजनिक, तर १४०० खाजगी गणेशमूर्तींचे विसर्जन होईल, अशी पोलिसांची आकडेवारी आहे. विसर्जनमार्गावर तात्पुरते लावले जाणारे बेकायदा स्टॉल, मंडपांना आम्ही परवानगी दिलेली नसून रहदारीला अडथळा होत असेल, तर कारवाईची जबाबदारी पोलिसांची असल्याचे सांगून पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी पोलिसांच्या कोर्टात चेंडू ढकलला आहे. पोलिसांनी मात्र पालिकेने कारवाई करावी, असे पालिकेला कळवले आहे.

मीरा-भार्इंदरमध्ये महापालिकेने शहरात २२ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये शिवार उद्यान येथील एका कृत्रिम तलावाचाही समावेश आहे. खाडीकिनारे, तलाव व समुद्रकिनारी पालिकेने विद्युत रोषणाईसह मंडप, आरतीसाठी टेबलव्यवस्था तसेच विसर्जनासाठी ५८० कर्मचारी, बोट, तराफे, हायड्रॉलिक क्रेन, फॉर्क लिफ्ट आदींची व्यवस्था केली असल्याचे आयुक्त खतगावकर म्हणाले.
विसर्जनमार्गावर लागणारे स्टॉल, मंडप, स्टेज, टेबल आदींसाठी आम्ही कुणालाच परवानगी दिलेली नाही. याचा रहदारीला अडथळा होत असेल वा यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अशा मंडप-स्टेजवर कारवाईची जबाबदारी पोलिसांची असल्याचे आयुक्त म्हणाले. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यासोबत मिळून पालिका कारवाई करेल, अशी पुस्तीही आयुक्तांनी जोडली.

दुसरीकडे, पोलीस उपअधीक्षक कार्यालय तसेच भार्इंदर पोलीस ठाणे आदींनी मात्र महापालिकेला पत्र देऊन विसर्जनमार्गावर अडथळा ठरणारे कोणत्याही प्रकारचे मंडप, स्टॉल आदी लावण्याची परवानगी देऊ नये, असे कळवतानाच पालिकेने कारवाई करावी, असे कळवले आहे. विसर्जनमार्ग आधीच अरुंद असताना त्यात लागणारे खाद्य-पेयाचे स्टॉल, स्वागत मंडप व स्टेज आदींमुळे गर्दी होऊन अगदी धक्काबुक्की व चेंगराचेंगरीही होते. उष्टं-खरकटं तसेच टाकून जात असल्याने दुसऱ्या दिवशी तर रस्त्यांचा उकिरडा झाला असतो. पोलीस दरवर्षी पालिकेला पत्र लिहून कळवत असतात. पण, पालिकेचे अशा स्टॉलधारकांशी तसेच राजकारण्यांशी असलेल्या अर्थपूर्ण संगनमतामुळे पालिका कारवाई करत नसल्याचा आरोप अ‍ॅड. सुशांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, विसर्जनासाठी शहरात ४७ पोलीस अधिकारी, ४४२ पोलीस कर्मचारी, १५० होमगार्ड यांच्याबरोबरच राज्य राखीव दलाची एक, तर दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, वाहतूक पोलिसांसह एनसीसी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. सीसीटीव्ही लावण्यात आले असून विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी सांगितले.

Web Title: Police, municipal machinery ready for Ganesh immersion; Adjustment of accuracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस