मंडळांपुढे पोलीस, पालिका हतबल
By admin | Published: August 16, 2016 04:43 AM2016-08-16T04:43:19+5:302016-08-16T04:43:19+5:30
गणेश मंडळांच्या कृत्रिम तलावाला विरोध लक्षात घेऊन आणि अवघ्या वीस दिवसात कृत्रिम तलावांची निर्मिती करणे अशक्य असल्याचे पाहून यंदा वसई विरार शहरात गणेश विसर्जनासाठी
- शशी करपे, वसई
गणेश मंडळांच्या कृत्रिम तलावाला विरोध लक्षात घेऊन आणि अवघ्या वीस दिवसात कृत्रिम तलावांची निर्मिती करणे अशक्य असल्याचे पाहून यंदा वसई विरार शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव प्रायोगिक तत्वावर केले जाणार आहेत. तर गणेश मंडळांनी पोलीस आणि पालिकेला न जुमानता पुन्हा एकदा रस्त्यांवर मंडप टाकून गणेश आगमनाची जोरदार तयारीही सुरु केली आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन कृत्रिम तलावातच होणार. रस्त्यांवर मंडप टाकू देणार नाही, अशा वल्गना करणारे पोलीस आणि पालिका प्रशासन गणेश मंडळांकडून प्रतिसाद न मिळाल्याने हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन समुद्रात करुन त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव करण्याचा राज्य शासनाने आदेश जारी केला आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असला तरी गणेश भक्तांचा मात्र कृत्रिम तलावांना विरोध असल्याचे दिसत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने कृत्रिम तलाव ही संकल्पना योग्य असली तरी गणेशोत्सवाला भावनिकतेची जोड असल्याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. आतापर्यंत गणेश मूर्तींचे नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करण्याची परंपरा चालत आहे. त्यामुळे कृत्रिम तलाव संकल्पनेबाबत गणेश भक्तांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
दरम्यान, यंदाच्या मोसमात वसई विरार शहरात गणेश विसर्जनासाठी एकही कृत्रिम तलाव पालिकेला अद्याप उभारता आलेला नाही. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरल्याने आता प्रायोगिक तत्वावरच कृत्रिम तलाव उभारले जाणार असल्याची सारवासारव पालिकेने केली आहे.
मुंबई, ठाणे, मीरा भार्इंदर आदी शहरांमध्ये दरवर्षी गणेश विसर्जनापूर्वी कृत्रिम तलाव उभारले जातात. वसई विरार महापालिकेने यापूर्वी कधीच कृत्रिम तलाव उभारले नव्हते. महापौर प्रवीणा ठाकूर यांनी कृत्रिम तलावांची संकल्पना मांडल्यानंतर
महासभेत त्याला मंजुरी देण्यात येऊन दोन कोटी रूपयांच्या निधीची तरदूत करण्यात आली होती. मात्र त्यासाठी जागांचे सर्वेक्षण, जनजागृती करणे आवश्यक होते. परंतु ते करण्यात आलेले नाही.
गणेश मंडळांपुढील विघ्न
चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्याच्या सक्तीवरही गणेशोत्सव मंडळांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. वसई तालुक्याच्या शहरी भागापासून समुद्रकिनारा फार लांबच्या अंतरावर आहे. तसेच यापूर्वी विभागवार विसर्जन स्थळांवर मोठ्या मूर्त्यांचे विसर्जन केले जायचे. परंतु आता चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्त्या समुद्रात विसर्जन करण्याची सक्ती लादण्यात येणार असल्याने गणपती मंडळांपुढे विसर्जनाचे मोठे विघ्न आणि वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण पडण्याची शक्यता होती.
पोलिसांनी धाडस दाखवावे
दुसरीकडे, पोलीस आणि पालिकेने रस्त्यांवर मंडप टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे ठणकावून सांगितले होते अशा मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. मात्र, सध्या वसई विरार परिसरातील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप टाकण्याचे काम सुरु केले आहे. पण, त्यातील एकावरही कारवाई करण्याचे धाडस पोलीस आणि पालिकेने दाखवलेले नाही.
ऐन वेळी कामाची घाई...
आता गणेशोत्सवाला अवघे वीस दिवस उरले आहेत. प्रशासनाच्या आढावा बैठकीत कृत्रिम तलाव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण ते काम पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे घाईघाईने प्रत्येक प्रभागात किमान दोन कृत्रिम तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
चार फुटांपेक्षा कमी उंचीचे गणपतींचे त्यात विसर्जन करण्याचा प्रयत्न आहे. परंतु शहरातील हजारो गणपती पाहता या थोड्या तलावात त्यांचे विसर्जन शक्य नाही. लोकांमध्येही त्याबाबत माहिती आणि जागृती नाही. त्यामुळे पालिकेने पहिले वर्ष असून प्रायोगिक तत्वावरच तलाव बांधत असल्याचे सांगितले आहे.
कृत्रिम तलाव बांधण्याची आधीपासून तयारी करायला हवी होती. पण, चांगली सुरुवात करत आहोत . शंभर टक्के कृत्रिम तलाव यंदा बांधू शकत नसलो तरी यापुढील वर्षात सर्वाधिक कृत्रिम तलाव वसई विरार शहरात असतील असे पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले. त्यामुळे कृत्रिम तलावात यंदा विसर्जन बंधनकारक नसल्याने स्पष्ट झाले आहे.