पोलीस अधिकारीच करतोय दारू तस्करी; उपनिरीक्षकासह चौघांवर गुजरातमध्ये गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 07:06 IST2023-01-12T07:05:49+5:302023-01-12T07:06:08+5:30
फरार पोलिस अधिकाऱ्यासह दोघांचा तपास गुजरात पोलिस करीत असून, याबाबत पालघर पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पोलीस अधिकारीच करतोय दारू तस्करी; उपनिरीक्षकासह चौघांवर गुजरातमध्ये गुन्हा दाखल
तलासरी : महाराष्ट्रात दमण बनावटीच्या दारूची आयात करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रात बंदी असलेल्या दारूची तस्करी करणाऱ्या टोळीचा गुजरातपोलिसांनी पर्दाफाश केला असून, यात तलासरी पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्याचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गुजरातमधील भिलाड पोलिस ठाण्याला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, यात दोघांना अटक करण्यात आली आहे.
फरार पोलिस अधिकाऱ्यासह दोघांचा तपास गुजरात पोलिस करीत असून, याबाबत पालघर पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तलासरी भागातून गुजरातमधील सुरत येथे दारू जात असल्याची खबर गुजरातच्या गुन्हे अन्वेषण विभागाला लागल्याने त्यांनी ६ जानेवारी रोजी सापळा रचून कारवाई केली होती. तलासरी भागातून गाडीत भरून जाणाऱ्या कारमधील ५५१ बाटल्या पकडण्यात आल्या होत्या.
यावेळी गुजरात पोलिसांनी कारमधील नवीन रणछोडभाई वरिया, तसेच नीरव उर्फ पिंटू मधुसूदन देसाई या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गाडीमधील दारू तलासरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक धांगडे, तसेच त्यांचा एक माणूस याने सुरतमधील अर्जुनभाई नावाच्या व्यक्तीस पोहोचवायची आहे, असे सांगितले. यावरून गुजरात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भिलाड पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. तलासरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक धांगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे गुजरात पोलिसांनी पालघर पोलिस अधीक्षकांना कळविले आहे. गुन्हा दाखल होऊन दारू तस्करीचा आरोप असलेले उपनिरीक्षक धांगडे सध्या आजारपणाच्या रजेवर आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे.