चौकीतच सुरू झाले नवीन पोलीस ठाणे
By admin | Published: July 9, 2015 11:21 PM2015-07-09T23:21:25+5:302015-07-09T23:21:25+5:30
राज्याच्या गृह विभागाने वर्षभरापूर्वी मंजूर केलेले नयानगर पोलीस ठाणे अनेक महिन्यांच्या शोधमोहिमेअंती शनिवारी (४ जुलै) सायंकाळच्या सुमारास घाईघाईने अखेर स्थानिक
भार्इंदर : राज्याच्या गृह विभागाने वर्षभरापूर्वी मंजूर केलेले नयानगर पोलीस ठाणे अनेक महिन्यांच्या शोधमोहिमेअंती शनिवारी (४ जुलै) सायंकाळच्या सुमारास घाईघाईने अखेर स्थानिक पोलीस चौकीतच सुरू करण्यात आले. त्याच्या प्रभारीपदी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.के. जाधव यांची नियुक्ती केली आहे.
मीरा-भार्इंदर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील पोलीस अपुरे पडत असल्याने मीरा रोड हद्दीत नयानगर लोकवस्तीच्या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी राज्याच्या गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला १४ मार्च २०१४ रोजी मंजुरी मिळाल्यानंतर स्वतंत्र नयानगर पोलीस ठाणे साकारण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
यानंतर, अनेक वादांमुळे या चौकीतच पोलीस ठाणे सुरू होणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने ६ मे २०१५ रोजी प्रसिद्ध केले होते. या पोलीस ठाण्यासाठी मीरा रोडच्या रसाझ मॉल परिसरात पोलीस ठाण्याचे आरक्षण असून त्याचा क्र. १८४-ए असा आहे.
या जागेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे २१ हजार ५०० चौरस फूट इतके असले तरी तत्कालीन पोलीस अधीक्षक मधुकर पांडे यांनी मॉलच्या मालकाला झुकते माप देऊन एकूण आरक्षणापैकी केवळ २० टक्के जागेत पोलीस ठाणे बांधून देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने आता जेमतेम साडेचार हजार चौरस फूट जागा हाती राहिली आहे. (प्रतिनिधी)