वादग्रस्त प्रार्थना केंद्राला पोलिसांचे टाळे
By admin | Published: February 7, 2016 12:44 AM2016-02-07T00:44:08+5:302016-02-07T00:44:08+5:30
प्रार्थनेच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या भुईगाव येथील आशिर्वाद प्रार्थना केंद्राला आज पोलिसांनी टाळे ठोकले.
वसई : प्रार्थनेच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या भुईगाव येथील आशिर्वाद प्रार्थना केंद्राला आज पोलिसांनी टाळे ठोकले. यावेळी अनुयायांना केंद्राबाहेर काढून पोलिसांनी केंद्राचा ताबा घेतला. पास्टर सॅबेस्टीन मार्टीन यांच्या प्रार्थना केंद्रात भोंदूगिरी सुरु असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वायलर झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि मनसेने केंद्राविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वसई पोलीस ठाण्यात पास्टर मार्टीन यांच्यासह त्याच्या दोन सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मार्टीन ठाणे येथील एका हॉस्पीटलमध्ये दाखल झाला होता. तर पोलिसांनी विष्णु कडवे आणि वैभव तरे यांना अटक केली होती. तसेच पोलिसांनी केंद्र बंद करून कायमस्वरुपी बंद करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. (प्रतिनिधी) मनसेने केली कारवाईची मागणी १शुक्रवारी मार्टीन यांच्या सुमारे अडीचशे सेवकांनी केंद्र सुरु करून प्रार्थना पुन्हा सुरु केली होती. यावेळी मोठ्या संख्येने अनुयायी गोळा झाले होते. ही कुणकुण लागताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलिसांनी भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. तर केंद्रात संध्याकाळी काही अज्ञात इसमांनी सेवकांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांनी त्याठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. २ शनिवारी सकाळपासून अनुयायी येऊ लागल्याने केंद्रात मोठी गर्दी जमली होती. याठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून केंद्रातील अनुयायांना बाहेर काढून केंद्र बंद करून त्याचा ताबा घेतला. त्यामुळे काही काळ येथील वातावरण तणावग्रस्त झाले होते. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून अनुयायांना शांतपणे आपापल्या घरी जाण्याचे निर्देश दिले. अंतरिम जामीन मंजूर दरम्यान, केंद्राचा प्रमुख मार्टीन याला कोर्टाने १२ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्याच्यावर काय कारवाई होते.याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त कायम ठेवला आहे.