पालघरमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश, लोण आता शहरापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 08:45 AM2023-05-28T08:45:25+5:302023-05-28T08:45:39+5:30

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालविवाहाचे लोण पालघर शहरात पोहोचले आहे.

Police success in preventing child marriage in Palghar | पालघरमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश, लोण आता शहरापर्यंत

पालघरमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश, लोण आता शहरापर्यंत

googlenewsNext

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालविवाहाचे लोण पालघर शहरात पोहोचले आहे. लग्न मंडपात दोन अल्पवयीन मुलांची लग्नगाठ बांधली जात असताना पालघर पोलिसांनी हे लग्न रोखत वधूला विरारच्या गुड शेफर्ड संस्थेकडे सुपूर्द केले आहे.

पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल असून, जिल्ह्याच्या पूर्व भागाकडील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी आदी आदिवासीबहुल दुर्गम भागात अल्पवयीन मुला-मुलींची लग्न लावून देण्याची प्रथा आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हे बालविवाह रोखण्यासाठी अनेक वर्षांपासूनचे प्रयत्न फोल ठरत असताना पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून ‘जनसंवाद अभियान’ या सामाजिक स्वास्थ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अभियानाला मोठे यश येत आहे. अनेक लोक या अभियानाला जोडले गेले आहेत. त्यातून अतिदुर्गम भागात आजही अनेक कुटुंबे स्वतः पुढे येत बालविवाहाला विरोध दर्शवत आहेत.

पालघर शहरातील न्यायालयाच्या शेजारी असलेल्या शांती नगर येथे अल्पवयीनांचा विवाह लावला जात असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनकडून पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अप्पासाहेब लेंगरे यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक मंजुळा शिरसाठ आणि उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे यांना घटनास्थळी पाठवले. तेथे पोलिसांना साध्या वेशात पाठवून संध्याकाळी ६:३० च्या दरम्यान लग्नगाठ बांधली जात असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करीत लग्न थांबविले. 

नवरी मुलीचे कुटुंब यवतमाळचे
नवरी मुलीचे कुटुंब यवतमाळचे आहे, तर  नवरदेवाचे कुटुंब पालघरचे आहे. दोन्ही कुटुंबांच्या मुलांचे कागदोपत्री पुरावे तपासल्यानंतर नवरदेवाचे वय १९, तर नवरी मुलीचे वय १७ असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर गावाकडे अशीच लग्ने लावली जात असतात, असे सांगत दोन्ही अल्पवयीन मुलांना सोडण्याची वऱ्हाडी मंडळी विनंती करत होते. मात्र, पोलिसांनी नवरी मुलीला महिला बालकल्याण समितीकडे पाठविले. समितीच्या आदेशाने या मुलीला विरार येथील गुड शेफर्ड संस्थेत पाठविण्यात आले. पुढील कारवाई पालघर पोलिस करत आहेत.

Web Title: Police success in preventing child marriage in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर