बंदोबस्तासाठी वसईतील पोलीस सज्ज, नवीन वर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये यासाठी कायद्याचे रक्षक दक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 11:33 AM2021-12-31T11:33:09+5:302021-12-31T11:33:22+5:30
Vasai : या नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.
नालासोपारा : जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर वसई तालुक्याच्या हद्दीमधील नऊही पोलीस ठाण्याचे पोलीस सज्ज झाले आहेत. अपघात होऊ नये, दारू पिऊन गाडी चालवू नये, ड्रग्स पिणाऱ्यांना पकडण्यासाठी, रेव्ह पार्टी होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची पथके तयार करण्यात आली आहेत. या नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.
सर्वत्र नवीन वर्षांचे सेलिब्रेशन होते; पण मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात होते. सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट, चायनीज दुकाने, केक शॉप, बीअर शॉप, वाईन्स शॉप यांना रंगोरगोटी करून उत्तम रोषणाई करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यासाठी पथके तयार केली आहेत. तालुक्यातील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्टवाल्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यात दिलेल्या अटी व नियमांचे पालन न झाल्यास हॉटेल व रिसॉर्ट मालकावर फौजदारी कारवाई करणार असल्याचे नमूद केलेले आहे.
घरी आणि इमारतींच्या गच्चीवर होणाऱ्या नववर्षाच्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. जर पार्टीमध्ये मद्य घेतले जाणार नसेल तर परवानगी घेण्याची गरज नाही, पण जर मद्य घेतले जाणार असेल तर परवानगी घेणे आवश्यक आहे. याचबरोबर बार, धाबे, महामार्गावरील हॉटेलमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. अबकारी विभागाने ख्रिसमस आणि वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात पूर्व द्रूतगती मार्ग, मुंबई-अहमदाबाद आणि अन्य हॉटेल्सवर नियमितपणे तपासणी सुरू केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
वसईत अनेक पोलीस पथके तयार केलेली आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह च्या केसेस करण्यासाठी मुख्य नाक्यावर नाकाबंदी केली जाणार आहे. रेव्ह पार्टी होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
- संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, झोन-२, वसई विरार
३१ डिसेंबरच्या रात्री रस्त्यावर, समुद्रकिनारी, हॉटेल, रिसॉर्ट येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वसई-विरार पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.
- प्रशांत वाघुंडे, पोलीस उपायुक्त, झोन-३, वसई विरार