भिंतीचे काम पोलीस संरक्षणात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:19 AM2018-12-06T00:19:58+5:302018-12-06T00:20:04+5:30
एनपीसीआयएलने नियोजित बोईसर ग्रामीण रुग्णालयाकरिता देण्यात आलेल्या जमिनीचा दावा न्यायालयात सुरू असल्याचे सांगून संरक्षक भिंत बांधण्यास मज्जाव केला असला तरी आज जिल्हा शल्यचिकित्सकांच्या उपस्थितीत पुन्हा काम सुरु करण्यात आले.
बोईसर : एनपीसीआयएलने नियोजित बोईसर ग्रामीण रुग्णालयाकरिता देण्यात आलेल्या जमिनीचा दावा न्यायालयात सुरू असल्याचे सांगून संरक्षक भिंत बांधण्यास मज्जाव केला असला तरी आज जिल्हा शल्यचिकित्सकांच्या उपस्थितीत पुन्हा काम सुरु करण्यात आले.
या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र या जमीनी बाबत सात डिसेंबरला न्यायालयात असलेल्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बोईसर ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्यानंतर १५ वर्षात प्रदिर्घ अडीचणीवर मात करीत बोईसर -तारापूर रस्त्यावरील बी ए आर सी कर्मचारी वसाहत व बी ए आर सी च्या वेअरहाऊस दरम्यान असलेल्या वनविभागाच्या सर्व्हे नं १०७ ए/30 मधील अडीच एकर जमीन महत्प्रयासाने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावे बोईसरच्या ग्रामीण रुग्णालय उभारणी करीता हस्तांतरित करण्यात आली त्या नंतर या जमिनीवर संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याची वर्क आॅर्डर आरोग्य विभागा कडून प्राप्त होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने कॉंट्रॅक्टर तर्फे सुरु केलेले काम एनपीसीआयएलच्या लीगल डिपार्टमेंट चे व अन्य अधिकारी यांनी बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन बांधकामाला हरकत घेतली व भारत सरकारच्या डिपार्टमेंट आॅफ एनर्जी आणि एनपीसीआयएलने सिव्हील सूट नं १४/२०१८ अन्वये ग्रामीण रुग्णालयाचे काम थांबविण्यासंदर्भात दावा दाखल केला सध्या या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु असल्याने कुठल्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही असे तोंडी व लेखी स्वरुपात पत्र दिले होते.
विशेष म्हणजे लेखी स्वरूपात दिलेले हे पत्र एनपीसिआयएलच्या किंवा संबधित प्रशासनाच्या लेटरहेडवर न देता साध्या कागदावर दिले होते. या नंतर पालघरच्या जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांनी तारापूर अणू ऊर्जा केन्द्राच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवून सर्व्हे नं १०७/३० ही जमीन जिल्हाशल्यचिकित्सक पालघर यांच्या नावे असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी न्यायालयाने बांधकाम न करण्या बाबत कुठलेही आदेश दिलेले नाहीत. त्याच प्रमाणे पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम हे जन हितार्थ करण्याचे योजिले होते तथापि आपण या शासकीय कामात जाणीवपूर्वक अडथळा आणत आहात त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आदिवासी जनतेच्या रु ग्ण सेवेवर होत आहे. या सरंक्षक भिंतीच्या बांधकामात अडथळा अथवा व्यत्यय आणल्यास आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे पत्रात नमूद केले होते मात्र बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास एका वाहनातून आलेल्यानी वाहनातूनच पाहणी केली त्या व्यतिरिक्त बीएआरसी व तारापूर अणू ऊर्जाचे कोणीही अधिकारी न फिरकल्याने काम दिवसभर सुरळीत सुरु झाले होते
>हे होते उपस्थित
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कांचन वानेरे सा.बांधकाम खात्याचे शाखा अभियंता ए.डी.जाधव, बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज शिंदे, कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, जिल्हा परिषद सदस्या रंजना संखे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र संखे, वीणा देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर तालुका अध्यक्ष संजय ज. पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य अतुल देसाई, ग्रामस्थ महेंद्र बोने, तेजस काठे आदि उपस्थित होते.