परिवहन सेवेवरून रंगले राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:13 AM2021-01-03T01:13:37+5:302021-01-03T01:13:49+5:30
अखेर वसई-विरार महापालिकेच्या बससेवेला सुरुवात : प्रवाशांना मिळाला दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : कोरोनाकाळापासून बंद असलेली वसई-विरार शहर महानगरपालिकेची परिवहन बससेवा अखेर १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही बससेवा मेसर्स एसएनएन कंपनीमार्फत सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नवीन वर्षात वसईकरांना भेट दिली आहे, मात्र त्याच वेळी भाजपनेही आम्ही केलेल्या मागणीमुळेच परिवहन सेवा सुरू झाल्याचा दावा केला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकारण रंगू लागले आहे.
वसई-विरार शहर महागरपालिकेच्या मुख्य कार्यालय येथे परिवहन बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, माजी सभापती प्रभाग ‘क’चे यज्ञेश्वर पाटील, माजी सभापती प्रभाग ‘ब’चे चिरायू चौधरी, माजी महिला बालकल्याण सभापती माया चौधरी, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, माजी नगरसेविका ममता सुमन, रंजना थलेकर, माजी परिवहन समिती सदस्य कल्पक पाटील, वसंत वरे, स्वप्निल कवळी व महानगरपालिका अधिकारी वर्ग, परिवहन सेवा कर्मचारी उपस्थित होते.
नालासोपारा, वसई येथेही परिवहन सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सध्या ९१ बस परिवहन सेवेच्या ताफ्यात आल्या असून, या बसेस ४३ मार्गांवर चालू करण्यात येणार आहेत. तसेच वाढीव मार्गांवर टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या परिवहन सेवेमार्फत वसई-विरार शहर
महानगरपालिका हद्दीतील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अपंग व वैद्यकीयदृष्ट्या गरजू नागरिकांना परिवहन सेवेच्या सवलती लागू होतील व त्या यापुढेही मिळणार असल्याचे मनपातर्फे सांगण्यात आले आहे.
आंदोलनामुळेच निर्णय
झाल्याचा भाजपचा दावा
वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने परिवहनची सेवा सुरू झाल्याबरोबरच राजकारणाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या दिवशी मनपाने परिवहन सुरू केल्याबरोबर आमच्या आंदोलनामुळे ही सेवा सुरू झाल्याचा दावा भाजपने केला आहे. आयुक्तांना भेटून दिलेल्या निवेदनांमुळे ही परिवहन सेवा सुरू झाल्याचेही भाजपने म्हटले आहे.