जिल्ह्यातील प्रदूषणबाधितांवर होणार उपचार; राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:16 PM2021-01-01T23:16:36+5:302021-01-01T23:16:42+5:30

राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश : कॅन्सर, किडनीसारख्या रोगांची लागण : मांगेला समाजाच्या लढ्याला यश

Pollution victims in the district will be treated! | जिल्ह्यातील प्रदूषणबाधितांवर होणार उपचार; राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

जिल्ह्यातील प्रदूषणबाधितांवर होणार उपचार; राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

Next

हितेन नाईक

पालघर : जिल्ह्यातील बोईसर एम.आय.डी.सी.च्या कारखान्यांतून होत असलेल्या प्रदूषणामुळे परिसरातील हजारो स्थानिक नागरिकांना कॅन्सर, किडनीसारख्या असाध्य रोगांची लागण झाल्याने हरित लवादाने त्यांच्यावर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा उभी करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यातील किनारपट्टीवरील १६ गावांत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

बोईसर एमआयडीसीमधील काही कारखान्यांमधून छुप्या मार्गाने सोडल्या जाणाऱ्या रसायनामुळे परिसरातील समुद्र, खाड्यांमध्ये मोठे प्रदूषण वाढून शेती, बागायती नापीक बनल्या होत्या. २५ एमएलडी क्षमतेच्या सीईटीपी प्लांटमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले होते. एके ठिकाणी प्रदूषण वाढत असताना दुसरीकडे एमआयडीसीने सीईटीपीमधून थेट नवापूरच्या समुद्रात ८.१ किलोमीटर लांब पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे परिसरातील गावांत प्रदूषणाची मात्रा वाढून स्थानिकांचे जीवन धोक्यात येणार असल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात जनहित याचिका दाखल केली होती.

हरित लवादात याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी एमआयडीसीमधील वाढत्या प्रदूषणाबाबत भक्कम पुरावे सादर केल्यानंतर हरित लवादाने बाधित गावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी समुद्र, खाड्या, शेत यांचे सर्वेक्षण करून तारापूर, दांडी, नवापूर प्राथमिक केंद्रातील आजारी रुग्णांची पडताळणी केल्यानंतर सुमारे १४ हजार रुग्ण हे कॅन्सर, किडनीग्रस्त, त्वचारोग, अस्थमा आदी गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती समोर आली होती.

हरित लवादाने याची गंभीर दखल घेत व्याधीग्रस्तांना योग्य उपचार प्रदान करून भूगर्भातील पाण्याचे साठेही प्रदूषित झाल्याने शुद्ध पाण्याच्या पुरवठ्याची व्यवस्था उभी करण्याचे आदेश दिले होते. हरित लवादाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला तीन वर्षांचा कालावधी लागला असला तरी विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी याकामी विशेष लक्ष पुरवले होते.
 

Web Title: Pollution victims in the district will be treated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.