तलावाचे काम युद्धपातळीवर सुरू; डिसेंबरपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:36 PM2020-02-27T23:36:10+5:302020-02-27T23:36:16+5:30
महापौरांच्या आदेशानंतर जलतरण तलाव लवकरच सुरू होणार
- आशिष राणे
वसई : वसई-विरार शहर महापलिकेचा नवघर माणिकपूर येथील ओमनगर भागातील आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव लवकरच सुरू होणार आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत महापौरांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
डिसेंबर २०१९ पासून दुरुस्तीच्या कामासाठी हा तलाव बंद ठेवण्यात आला होता. आता या आठवड्यात पाणी फिल्टरेशनचे काम पूर्ण होताच हा तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती ‘एच’ प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गिलसन घोन्सालवीस यांनी ‘लोकमत’ला दिली.
या संदर्भात नागरिकांची तक्र ार आल्यावर २० डिसेंबर रोजी त्याची पाहणी केली असता, या तलावाला गळती लागल्याचे लक्षात आले होते. याकडे कोणी लक्ष देत नाही, असे दिसल्यावर ‘लोकमत’ने २० डिसेंबरच्या अंकात ‘दररोज शेकडो लिटर पाणी वाया’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर महापौर प्रवीण शेट्टी यांनी लागलीच युद्ध पातळीवर या जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.
ज्यांनी वर्षभराचे पास काढले आहेत, त्यांना याचा आर्थिक फटका बसू नये, त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बंद असलेल्या काळातील दिवस भरून मिळतील, असे आश्वासनही महापौर शेट्टी यांनी दिले आहे.
दरम्यान, डिसेंबरमध्ये या तरणतलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने गळती लागून यातून मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचे समोर आले होते. ही गळती होत असलेल्या भागाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी पालिका तसेच स्विमिंग पुलाच्या व्यवस्थापनाकडे केली होती.
त्यानुसार, या तरणतलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र दुरुस्तीचे काम हाती घेऊन नेमकी गळती कुठून होत आहे याचा बोध होत नव्हता. आणि बांधकाम तसेच पाणी खाते यांच्यात या दुरुस्तीवरून तू - तू - मैं - मैं होत होती.
‘लोकमत’ने वृत्त छापल्यानंतर महापौरांनी तत्काळ कार्यवाही करत या दोन्ही विभागाला धारेवर धरत काम सुरू केले.
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात, पोहण्यास येणाऱ्या नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. यात ज्यांनी सहा महिने आणि वर्षभराचा पास काढला, त्यांचे दोन महिन्यांचे पैसे वाया गेले.
वसई पश्चिमेतील नवघर माणिकपूर परिसरात महापालिकेतर्फे २५ बाय १५ मीटर सें.मी. लांबीचा आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे. येथे सकाळ व संध्याकाळी नागरिक येतात.
एप्रिल २०१९ मध्ये याच तलावात बुडून एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा तलाव पोहण्यासाठी बंद करण्यात आला.
त्यानंतर पोलीस आणि महापालिका आयुक्तांच्या चौकशीनंतर आॅक्टोबर २०१९ मध्ये हा तरणतलाव महापालिकेने पुन्हा सुरू केला होता.