मोखाड्यात बहुतांश पिकअप शेडची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 11:53 PM2021-03-07T23:53:44+5:302021-03-07T23:54:08+5:30
ऊनपावसात ताटकळतात प्रवासी : आमदार-खासदार निधीतून केले होते बांधकाम
खोडाळा : मोखाडा तालुक्यात रस्त्यावरील गावांच्या बसथांब्यांवर ठिकठिकाणी आमदार, खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून पिकअप शेड (प्रतीक्षागृह) बांधण्यात आलेली आहेत. मात्र, यातील ९० टक्के पिकअप शेड उघडेबोडके झाले असून बहुतेक ठिकाणच्या शेडचे तर नामोनिशाणही राहिलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना आजही ऊन-पावसातच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
तालुक्यात तत्कालीन आमदार-खासदार स्थानिक विकासनिधीतून बांधण्यात आलेली ४० हून अधिक पिकअप शेड आहेत. मात्र, आज हे पिकअप शेड उघडेबोडके व भुईसपाट झाल्याने विनावापर पडून आहेत. एका पिकअप शेडमागे साधारणत दीड ते दोन लाख रुपये शासनाने खर्च केलेले आहेत. ४० पिकअप शेडपैकी ४ ते ५ सुस्थितीतील शेडचा अपवाद वगळल्यास इतर शेड असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे प्रवाशांना आजही ऊन-पावसात ताटकळत बसेस अथवा इतर प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
दरवर्षी वाढत्या खर्चामुळे ही अंदाजपत्रकीय रक्कम आता कैैकपटीने वाढली आहे. किमान एक ते दीड लाखांत पिकअप शेड बांधली तर तिचा दर्जा व प्रतवारी टिकावू स्वरूपाची राहत नसल्याची प्रतिक्रिया ठेकेदारांमधून व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारे बांधलेली पिकअप शेडची सुरक्षा ग्रामस्थांनी ठेवली तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण होऊन प्रवाशांची अडचणही टाळता येईल. परंतु, तसे न होता ग्रामस्थच या पिकअप शेडच्या सामग्रीची चोरी करीत असल्याने पिकअप शेड दिसेनासे होत आहेत, अशी प्रतिक्रिया येथील ठेकेदार व्यक्त करीत आहेत.
मोखाडा तालुक्यातील समग्र पिकअप शेडची अक्षरशः वाताहत झालेली आहे. आमच्यासारख्या प्रवाशांसाठी ही पिकअप शेड म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशीच आहेत. त्याऐवजी शासनाने स्टीलचे स्ट्रक्चर उभे केल्यास प्रवाशांना कायमस्वरूपी निवारा मिळेल, अशी प्रतिक्रिया प्रवासी हितवर्धक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे यांनी दिली आहे.