लोकप्रतिनिधीची मुदत संपल्याने शौचालयांची दुरवस्था; वसई-विरार पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 05:18 PM2021-11-28T17:18:11+5:302021-11-28T17:18:28+5:30
Vasai-Virar : नायगाव पश्चिम भागात नायगाव कोळीवाडा परिसर आहे. या भागात ग्रामपंचायत काळापासून महिलांना उघड्यावर शौचास बसण्याची वेळ येऊ नये यासाठी इथे सार्वजनिक महिला शौचालय तयार केले होते.
- आशिष राणे
वसई : मच्छीमार बांधवांचे आगर म्हणजे वसई तालुक्यातील नायगाव. याच नायगाव कोळीवाड्यात महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या सार्वजनिक महिला शौचालयांची मागील वर्ष दीड वर्षात अत्यंत वाईट अशी दुरावस्था झाली आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे महापालिकेवर प्रशासक राज आणि त्यात दि. २८ जून २०२० पासून लोकप्रतिनिधीची मुदतच संपल्याने या शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीकडे वसई विरार महापालिकेने दुर्लक्ष केले, हे उघड झाले आहे. त्यामुळे नक्कीच या भागात महिलांना शौचास जाण्यास असंख्य अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
नायगाव पश्चिम भागात नायगाव कोळीवाडा परिसर आहे. या भागात ग्रामपंचायत काळापासून महिलांना उघड्यावर शौचास बसण्याची वेळ येऊ नये यासाठी इथे सार्वजनिक महिला शौचालय तयार केले होते. परंतु सध्या हा भाग महापालिकेच्या हद्दीत मोडत असला तरी मात्र पालिकेने या शौचालयाच्या व आजूबाजूच्या परिसराच्या देखभाल दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच या शौचालयाची अत्यंत बिकट स्थिती आता उघड झाली आहे.
दरम्यान, याठिकाणी तयार करण्यात आलेली शौचालये ही अक्षरशः मोडकळीस आली असून त्यावर झाडेझुडपे देखील आहेत तर काही शौचालयांचे दरवाजे देखील तुटलेल्या -फुटलेल्या अवस्थेत आहेत. तर दुसरीकडे शौचालयांच्या ठिकाणी ये- जा करण्याच्या मार्गातही रात्रीच्या सुमारास अंधार असल्याने या भागात शौचास जाण्यास मोठ्या अडी- अडचणी निर्माण होत असल्याचे येथील महिला सांगत आहेत.
आजूबाजूला रान- गवत वाढलेले असल्याने एखाद्यावेळी चुकूनही सर्प पायाखाली आला तर सर्पदंश होऊन एखादी जीव धोक्यात घालणारी दुर्घटना घडण्याची भीती ही याठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या शौचालयाच्या समोर आडोशासाठी भिंत तयार केली होती ती सुध्दा आता बऱ्यापैकी तुटून गेली आहे. अशा विविध प्रकारच्या दुरावस्थेमुळे येथील शेकडो महिलांची शौचाची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. दरम्यान, पालिकेने या जीवघेण्या व मोडकळीस आलेल्या महिला शौचालयाची तात्काळ दुरुस्ती करून या भागात योग्य त्या मुलभूत व सकारात्मक उपाययोजना उपलब्ध करून देण्याची मागणी आता यानिमित्ताने येथील नायगाव कोळीवाडा स्थित नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
मागील २८ जून २०२० ला वसई विरार महापालिकेची मुदत संपली व आजतागायत महापालिकेचा कारभार आयुक्त तथा प्रशासक म्हणून सांभाळत आहेत. त्यामुळे यापूर्वी आणि दीड वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधी समस्या तक्रारी पहायचे मात्र आता लोकप्रतिनिधीच नसल्याने ही बिकट दुरावस्था झाली आहे आणि त्याचे पालिका व तिचा आरोग्य विभाग ही लक्ष देत नाही ही शोकांतिका आहे.
- नायगाव ग्रामस्थ.