भिवंडी - कल्याण - शिळ महामार्गावर निकृष्ट दर्जाचे काम; मनसेने पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 06:22 PM2021-07-20T18:22:57+5:302021-07-20T18:23:16+5:30
कंत्राटदारावर संबंधित अधिकारी मेहेरनजर करीत असून कंत्राटदाराने त्याने केलेल्या निकृष्ट रस्त्याच्या बांधकामावर एकप्रकारे अधिकारी पांघरून घालायचे काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी मनसेचे परेश चौधरी यांनी केला आहे.
- नितिन पंडीत
भिवंडी : भिवंडी-कल्याण-शीळ हा राज्य महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नव्याने तयार होत असलेल्या सहापदरी सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या सदोष बांधणी व निकृष्ठ दर्जाच्या काँक्रीटीकरणाबाबत संबंधित रस्ते विकासक मे.साकेत एसएमएस जेव्ही ह्या ठेकेदाराविरुद्ध सातत्याने पुराव्यानिशी तक्रार देऊनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता अनिरुद्ध बोर्डे व मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के हे कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसून ते अप्रत्यक्षपणे ठेकेदाराला मदत करीत असल्याचा आरोप मनसेने केला असून मनसेचे विद्यार्थी सेनेचे भिवंडी तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी रस्त्याचे निकृष्ठ काम प्रत्येक्ष कामाची पाहणी करून थांबविले.
या कंत्राटदारावर संबंधित अधिकारी मेहेरनजर करीत असून कंत्राटदाराने त्याने केलेल्या निकृष्ट रस्त्याच्या बांधकामावर एकप्रकारे अधिकारी पांघरून घालायचे काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी मनसेचे परेश चौधरी यांनी केला आहे. मनसे च्या पाहणटी वेळी रस्त्याच्या काँक्रेटकरण सुरू असताना त्याच रस्त्यावरील दुसऱ्या मार्गिकेत तर चक्क एक मीटर लांब तर अर्धा फूट खोलीचा महाकाय खड्डा पडलेला मनसेचे चौधरी यांच्या निदर्शनात आले असता या निकृष्ठ कामाची तक्रार करत मनसेचे विद्यार्थी सेनेचे भिवंडी तालुकाध्यक्ष परेश चौधरी व उपतालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुनील देवरे, उत्तम चौधरी यांनी संबंधित ठेकेदाराचे निकृष्ट दर्जाचे काँक्रीटीकरण थांबवून काम बंद पाडले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन चौधरी यांनी संबंधित रस्त्याच्या काँक्रीटचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावे अशी मागणी केली.
जोपर्यंत भिवंडी कल्याण शिळ रस्त्याचे बांधकाम हे शासनाने दिलेल्या निविदेनुसार होत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम बंदच ठेवण्यात येईल असा सज्जड दमच मनविसे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी यावेळी दिला आहे.