गरीब आदिवासी कुटुंबांना पुन्हा मिळणार ‘खावटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 01:01 AM2020-09-26T01:01:19+5:302020-09-26T01:01:27+5:30
अनुदान योजनेचे पुनरुज्जीवन : लाभार्थी यादीसाठी पाचसदस्यीय समिती, कोरोना संकटकाळात दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकट उद्भवले असून अनुसूचित जमातीच्या आदिवासी कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी शासनाने खावटी अनुदान योजनेचे २०२०-२१ या एका वर्षासाठी पुनरुज्जीवन केले आहे.
९ सप्टेंबर २०२० रोजी पारित निर्णयान्वये आदिवासी कुटुंबांना प्रतिकुटुंब चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी दोन हजार रुपये अन्नधान्य वस्तू स्वरूपात तर दोन हजार रुपये बँक अथवा डाक खात्यात वितरित केले जातील. त्यामुळे जिल्ह्यातील पात्रताधारक कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल, अशी माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
यांनी दिली.
लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी ग्रामस्तरावर पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, डाकसेवक, कृषीसेवक, मुख्याध्यापक/शिक्षक (आश्रमशाळा, जि. प. शाळांतील उपक्रमशील शिक्षक) यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पात्रतेच्या निकषांवर आधारित याद्या तयार करणार आहेत.
पात्रतेच्या निकषांमध्ये दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर, आदिम जमातीची सर्व कुटुंबे, पारधी समाजाची सर्व कुटुंबे, प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेल्या परित्यक्ता, घटस्फोटित महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब, वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंबे यानुसार निकष निर्देशित केले आहेत.
शासनस्तरावरून अर्जाचा नमुना प्राप्त झाल्यानंतर समितीकडून लाभार्थ्यांची छाननी करून अंतिम लाभार्थ्यांची यादी करण्यात येईल. काही संस्था, संघटना व्यक्तीकडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण करत असल्याची बेकायदेशीर बाब निदर्शनास आली आहे. या योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त तालुका तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहितीसाठी ग्रामस्तरावरील समितीशी संपर्क साधावा.
- आशिमा मित्तल, प्रकल्प अधिकारी, डहाणू