खड्ड्यांवरून शिवसेना, मनसे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 03:03 AM2018-07-21T03:03:06+5:302018-07-21T03:03:09+5:30

तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्या नंतर निवेदन, तक्रारी देऊनही ही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालीत कार्यालयाला कुलूप ठोकले.

From the potholes, Shivsena, MNS road | खड्ड्यांवरून शिवसेना, मनसे रस्त्यावर

खड्ड्यांवरून शिवसेना, मनसे रस्त्यावर

Next

पालघर : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्या नंतर निवेदन, तक्रारी देऊनही ही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालीत कार्यालयाला कुलूप ठोकले.
सध्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. नव्याने बांधलेल्या रस्त्यांवर सहामहिन्यातच खड्डे पडल्याने सा. बां. विभागातील भ्रष्टाचार उघड होत आहे. तालुक्यात पालघर- बोईसर, बोईसर- तारापूर, पालघर -मनोर, बोईसर-चिल्हार मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. रोज अपघाताच्या घटना घडत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.
शुक्र वारी पालघर मनसे च्या वतीने पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता विवेक बढे आणि उपविभागीय अभियंता महेंद्र किणी हे उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी किणी त्यांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू करून शाखा अभियंता सोनजे, गायकवाड यांनाही जमिनीवर बसवले. यावेळी उपविभागीय अभियंते किणी यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. त्यानंतर शाखा अभियंत्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.
मनसेच्यावतीने सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंता विवेक बढे यांच्या कार्यालयात मनसेच्या वतीने आजच्या आंदोलनाबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. असे असताना मी कार्यालयीन कामासाठी बोईसर येथे गेलो असताना मनसेचे लोकसभा जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यालयात शिरून माझ्या खुर्चीला हार घालून तेथे उपस्थित अभियंत्यांना अपमानास्पद वागणूक देणे चुकीचे असल्याचे अभियंता किणी यांनी लोकमत ला सांगितले. त्यामुळे पोलीस अधिक्षकां कडे गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सुनील राऊत, भावेश चुरी, धीरज गावड, गीता संखे, अनंत दळवी, समीर मोरे, मंगेश घरत आदी मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
>शिवसेनेचे भीख मांगो व रास्ता रोको
बोईसर : येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे तसेच पूल व रस्त्यावर ठाण मांडलेल्या फेरीवाल्यांमुळे हाणाºया वाहतूक कोंडीचा संताप शुक्रवारी शिवसेनेने आंदोलना द्वारे व्यक्त केला. त्याचे स्वरुप भिखमांगो व रास्तारोको असे होेते.
भर पावसात झालेले हे आंदोलन लक्षवेधी ठरले. आंदोलनाच्या ठिकाणी संबधीत खात्याच्या अधिकाºयांनी प्रत्यक्ष येऊन आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सेनेच्या पालघर तालुका प्रमुख नीलम संखे यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, जिल्हा प्रमुख राजेश शहा व वसंत चव्हाण, उपजिल्हा प्रमुख राजेश कुटे, पालघर विधानसभा प्रमुख वैभव संखे, तालुका प्रमुख सुधीर तामोरे, बोईसर शहर प्रमुख मुकेश पाटील, पं.स.सभापती मनीषा पिंपळे, पं.स.उपसभापति मेघन पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सचिन पाटील, सुभाष म्हात्रे, गिरीष राऊत, कल्पेश पिंपळे महिला जिल्हा संघटक ज्योति मेहेर व शिवसेनेचे युवासेनेचे,महिला आघाडीचे, रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
>वाड्यातील खड्ड्यांना मंत्री, आमदारांची नावे
वाडा : तालुक्यातील बहुतांशी रस्ते खड्डेमय झाल्याने अनेकांना कंबरेचे त्रास सुरु झाले आहेत. मात्र, प्रशासन तसेच तालुक्यातील मंत्री,आमदार,खासदार यांनी त्याची साधी दखल सुद्धा घेतली नसल्याने मनसेने शुक्रवारी आपल्या स्टाईलने आंदोलन करुन सरकारचे कान खेचले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना मंत्री, खासदार व आमदार यांची नावे देऊन सरकार व लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. भिवंडी-वाडा- मनोर या मुख्य रस्त्यासह अनेक अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील काही रस्ते मे महिन्यात बांधण्यात आले असून पहील्या पावसाच्या फटकात जून महिन्यातच त्यांची दुर्दशा झाली. मुख्य रस्ता असलेला भिवंडी वाडा रस्त्यासाठी टोल आकारला जात असतानाही या रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डेपडले आहेत. या नामकरण आंदोलनामधे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सवरा, खासदार कपिल पाटील,आमदार शांताराम मोरे यांची नावे खड्डेमय रस्त्यांना देण्यात येऊन प्रशासनाचे आणि आमदार खासदार आणि मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचे काम मनसे कडून करण्यात आले.

Web Title: From the potholes, Shivsena, MNS road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.