वीज वितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 01:52 AM2019-12-02T01:52:10+5:302019-12-02T01:52:17+5:30
कासा आणि चारोटी भागात वीज बिले वाटपाचा ठेका नाशिक येथील शिवकृपा सर्व्हिसेस या कंपनीकडे आहे.
कासा : डहाणू तालुक्यातील कासा आणि चारोटी विभागातील वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना कित्येक महिन्यांपासून बिलेच दिली जात नाहीत. एवढेच नव्हे तर बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कासा आणि चारोटी भागात वीज बिले वाटपाचा ठेका नाशिक येथील शिवकृपा सर्व्हिसेस या कंपनीकडे आहे. मात्र, ७ ते ८ महिन्यांपासून जवळपास ४० ते ५० गावांमध्ये वीज देयके मिळाली नसून वीज बिले न भरल्यास कारवाईचा बडगा उगारला जात आहे. वीज बिले वितरण करणारे ठेकेदार वीज बिल वाटप करत नाहीत. त्यामुळे बिले मिळत नसल्याने ती वेळेवर भरली जात नाहीत. बिले थकली की वीज वितरण कर्मचारी वीज पुरवठा खंडित करण्यास आल्यावर ग्राहक आणि वीज कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतात. दरम्यान बिल मिळत नसल्याबाबत वीज वितरण कर्मचाºयांकडे विचारणा करता तुम्ही आॅनलाइन बिल काढून घ्या आणि बिले भरा अन्यथा मीटर काढून वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी उत्तरे मिळत आहेत. या मनमानी कारभाराबाबत ग्राहक संतप्त झाले असून याबाबत कासा ग्रामपंचायत सरपंचांनी या सर्व प्रकारची थेट कासा पोलीस ठाण्याकडे तक्रार केली आहे. बिल वेळेत मिळत नाही आणि ते न भरल्याने वीजपुरवठा खंडित करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनेक वीज ग्राहकांनी ग्राम सभेत वीज बिलासंबंधी तक्र ार आल्या आहेत. त्यामुळे अनेकवेळा ग्रामपंचयायतमार्फत वीज वितरणकडे विजेच्या समस्या, बिले याबाबतीत निवेदने दिली. परंतु त्यात काहीच सुधारणा होत नसल्याने कासा पोलीस ठाण्यात याबाबतीत तक्रार दाखल केली आहे. तसेच सदर भाग हा आदिवासी व दुर्गम आहे त्यामुळे येथील काही ग्राहक अशिक्षित आहेत. त्यामुळे ते आॅनलाइन बिल काढून कशी भरतील.
- रघुनाथ गायकवाड, सरपंच, ग्रामपंचायत कासा
‘वीज बिल वाटप होत नसल्याबद्दल मुख्य कार्यालयाकडे माहिती दिली आहे. ठेकेदार बिल वाटप करत नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन सध्या वीज वितरणचे कर्मचारी थकीत बिल वाटप करत आहेत. लवकरच यामध्ये सुधारणा होईल.
- सी.आर.मोरे, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण, कासा