न्याहाळे गावात महिनाभर वीज गुल
By admin | Published: July 8, 2017 05:14 AM2017-07-08T05:14:23+5:302017-07-08T05:14:23+5:30
तालुक्यातील न्याहाळे गावातील विद्युत ट्रान्सफार्मर जळाल्याने गेल्या महिनाभरापासून येथील आदिवासी कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : तालुक्यातील न्याहाळे गावातील विद्युत ट्रान्सफार्मर जळाल्याने गेल्या महिनाभरापासून येथील आदिवासी कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. जव्हार महावितरणकडे तक्र ार करूनही ते लक्ष देत नसल्याची खंत ग्रामस्थांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.
तालुक्यापासून नाशिककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर १४ कि.मी. अंतरावर असलेल्या न्याहाळे गावात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत आश्रम शाळा आहे. तसेच इयत्ता ८ वी ते १० वीपर्यंत न्याहाळे हायस्कुल आहे.
त्यामुळे या दोन्ही शाळा मिळून जवळपास ५५० विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. मात्र, येथील विद्युत ट्रान्सफार्म गेल्या महिनाभरापासून जळाला असल्याने वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा असा प्रश्न शिक्षक वर्ग विचारत आहे. तसेच वीज नसल्याने मोटार बंद पडल्याने येथील ग्रामस्थांना व शाळेतील विद्यार्थांना डबके, नदी नाले, ओहळा वरील पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाईप लाईनचे शुद्ध पाणी प्यायला मिळत नसल्याने या गावात गत काही दिवसांत आजाराचे प्रमाण देखील वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
न्याहाळे येथे जळालेला ट्रान्सफार्मर काढून नवा बसविण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी व शाळेच्या मुख्याध्यापकांनी जव्हार महावितरण कार्यालयाकडे केली आहे. परंतु अजुन तरी नवीन विद्युत ट्रान्सफार्म बसविण्यात आलेला नाही.
त्यामुळे न्याहाळे परिसरातील शाळकरी विद्यार्थांना व ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. महावितरण कार्यालयाच्या या ढिसाळ व बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे नाराजी व्यक्त होत आहे.
एकिकडे वीज बील वेळच्या वेळी पाठविणाऱ्या महावितरणकडून वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी महिनाभर लागत असल्याने कारवाईची मागणी होत आहे. काही दिवसांपुर्वी या
भागात सर्प दशांच्या घटना घडल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांबाबत अधिक्षकांनी चिंता व्यक्त केली आहे.
न्याहाळे गावातील जळालेला ट्रान्सफार्म हा नवीन ट्रान्सफार्म आहे. त्यामुळे ज्या विद्युत कंपनीने हा ट्रान्सफार्म बसविलेला आहे. ट्रान्सफार्मची मुद्दल आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बदलून घ्यावा लागेल. त्यामुळे उशीर झाला आहे. लवकरच विद्युत करून देण्यात येईल.
-व्ही.एस.तळणीकर,
सहायक अभियंता, जव्हार.