वसईत उकाड्यात विजेचा लपंडाव, नागरिक हवालदिल, महावितरण कार्यालयातील फोन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 01:31 AM2020-05-14T01:31:09+5:302020-05-14T01:31:24+5:30

लॉकडाउनमुळे आणि वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे लोकांना सध्या घरीच राहावे लागत आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाल्यानंतर लोकांना होणारा त्रास असह्य करणारा आहे.

Power outage in Ukada in Vasai, citizens in a state of panic | वसईत उकाड्यात विजेचा लपंडाव, नागरिक हवालदिल, महावितरण कार्यालयातील फोन बंद

वसईत उकाड्यात विजेचा लपंडाव, नागरिक हवालदिल, महावितरण कार्यालयातील फोन बंद

Next

वसई : सर्वत्र कोरोनाचे संकट, लॉकडाऊन आणि त्यात मे महिन्याचा कडक उन्हाळा यामुळे आधीच लोक हैराण झालेले आहेत. त्यात दिवसापेक्षा रात्रीचा उकाडा असह्यहोत असताना वसई-विरार भागात विजेचा लपंडाव सुरू झालेला आहे. यामुळे भाबोळा, सुयोगनगरसह अनेक भागातील नागरिक विजेअभावी हवालदिल झाले आहेत.

लॉकडाउनमुळे आणि वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे लोकांना सध्या घरीच राहावे लागत आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाल्यानंतर लोकांना होणारा त्रास असह्य करणारा आहे. महावितरणच्या उमेळमान कार्यालयात लँडलाईन दूरध्वनी बंद, रात्री कार्यालय ओस आणि कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्तीच नाही. प्रभारी पदभार असलेले अभियंता व उपकार्यकारी अभियंता नॉट रिचेबल असतात, अशी स्थिती आहे. यामुळे संपर्काअभावी रात्री-अपरात्री वीज खंडित झाल्याची तक्रार नागरिकांनी नेमकी कुठे करायची, असाही प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

मागील दहा-बारा दिवसांपासून महावितरणच्या वसई अर्बन उपविभाग हद्दीत मोडणाऱ्या भाबोळा, सुयोगनगर, चुळणे आदी भागांतील वीज दिवसा अधूनमधून जाते ती वेगळीच, आता तर रात्री ११ नंतर विजेचा दाब कमी-जास्त होणे, प्रसंगी वीज खंडित होण्याचे प्रकार सतत घडत आहेत. सतत आलटून पालटून दोन फेज जातात. हे आता नित्याचेच झाले आहेत.

गेले काही दिवस परिसरातील काही इमारतींत रात्रभर वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. महापौर प्रवीण शेट्टी आणि स्थानिक नगरसेवक फ्रँक आपटे आदींशी याबाबत संपर्क केल्यावर सकाळी वीज पूर्ववत झाली, मात्र हे प्रकार रोजच होत असून रात्री वीज गेल्यावर थेट कार्यालय गाठून लाईनमनला बोलावून आणावे लागते, तर काही वेळाने पुन्हा वीज जाते. लाइनमनच्या मते येथील ओव्हरलोडमुळे कधी एक फेज तर कधी दुसरा फेज फेल होत असतो, तर वीज कंपनीच्या वरिष्ठांना संपर्क केला तर येथील कनिष्ठ अभियंता यांची बदली झाली आहे, तर वसई उपकार्यकारी अभियंता मोबाइल उचलत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

१०० टक्के वसुली, मग हा त्रास का?
महावितरण कंपनीच्या स्टेला विभागात शेकडो इमारती असून येथील वीजग्राहक हा नियमित देयके भरणारा आहे. या भागातील वीजबिलवसुली जवळपास १०० टक्के आहे. मात्र, या बदल्यात अजूनही महावितरणने ठोस अशी दुरुस्ती केलेली नाही.

उदाहरण द्यायचे झाले तर कुठे तारा तुटणे, विजेचा खांब पडणे, जम्पर तुटणे, ट्रान्सफॉर्मर, वीजगळती असे नानाविध प्रकार दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळीही नित्याचे झाले आहेत. प्रसंगी विजेचा लपंडाव व कमीजास्त दाबामुळे ग्राहकांच्या किमती वस्तूंचे नुकसान होत आहे. यामुळे येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कनिष्ठ अभियंता तत्काळ नियुक्त करावा

स्टेलास्थित उमेळमान विभागाच्या कार्यालयात स्थानिक तथा तज्ज्ञ कनिष्ठ अभियंत्यांची नेमणूक करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. आ. हितेंद्र ठाकूर आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना ट्विटरवरून तक्रारी केल्या आहेत. स्टेला चुळणे भागात सातत्याने वीज खंडित होत आहे, आधीच लॉकडाऊन आहे, लोक त्रस्त आहेत आणि त्यात या वीज समस्येवर तोडगा निघत नाही व अधिकारीही लक्ष देत नाहीत. नागरिकांच्या तक्रारींची दखल वरिष्ठांकडून घेतली जात नाही. त्यामुळे आता नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार करत आहेत.

Web Title: Power outage in Ukada in Vasai, citizens in a state of panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.