पालघरमध्ये ७५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:30 PM2019-08-04T23:30:25+5:302019-08-04T23:30:36+5:30
महावितरणाकडून युद्धपातळीवर काम; ५७ वाहिन्यांमध्ये झाला होता तांत्रिक बिघाड
पालघर : मुसळधार पावसामुळे रविवारी पालघरमध्ये एकूण ५७ वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अंदाजे ७५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे झाडे वाहिन्यांवर उन्मळून १४ खांब, उच्चदाबाचे सहा खांब आणि ५ रोहित्रांचे नुकसान झाले.
वीजपुरवठा खंडित झालेल्या ५७ वाहिन्यांपैकी ३५ वाहिन्यांचा पुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित २२ वाहिन्यांवरील अंदाजे २७ हजार ग्राहकांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पाऊस आणि वाºयामुळे कामात अडचणी येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष घालत असून ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यातील करवळ ग्रामपंचायत अंतर्गत गावातील ४० ते ५० ग्रामस्थ खरेदीसाठी गेलेले अडकून पडले होते. या दुर्गम भागात आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत पोहचणे कठीण असल्याने दोरखंडाच्या मदतीने सुखरूप सुटका करून घेतली. पुलाला जोडणारा रस्ता वाहून पुराच्या पाण्यात वाहून गेला. अतिशय दुर्गम भाग असल्याने अशा संकटावर एकत्रित जमून मात करत असल्याचे एकनाथ झुगटे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
वसई तालुक्यातील उपकेंद्रात पाणी शिरल्याने रविवारी सकाळी साडेसहा वाजता वीजपुरवठा खंडित झाल्याने सुमारे दीड लाख ग्राहक बाधित झाले होते. त्यामुळे नवघर औद्योगिक वसाहत, सातीवली-अग्रवाल औद्योगिक वसाहत,सनसिटी परिसर बाधित झाला होता. मोखाडा उपकेंद्रातून जाणारी खोडाळा वाहिनी बंद पडल्याने खोडाळा, सडकवाडी, डोल्हारा आदी भागतील ५ हजार १०० ग्राहक बाधित झाले होते. तसेच केळवे रोड, दापचरी, डहाणू आदी भागात सतत पुरवठा खंडित होत होता. रविवारी सकाळपर्यंत सरासरी १९०.०८ मिमी पाऊस झाला. जूनपासून आतापर्यंत एकूण २ हजार २५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
वसई तालुक्यात २१४.३३ मिमी, वाडा २५२.८१, डहाणू ७०.७०, पालघर २२२.३३, जव्हार २३१.७५, मोखाडा- २५८.५०, तलासरी ८५.६३ आणि विक्रमगड १८७.८८ मिमी. इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धामणी धरणाची आजची पाणीपातळी ११७ मी. असून पाणीसाठा २५५.२२१ दशलघमी म्हणजेच 92.35% इतकी आहे. कवडास उन्नैयी बंधाºयाची पाणी पातळी ६६.९० मीटर. तर पाणीसाठा ९.९६ दशलक्षघमी असून हा बंधारा १०० टक्के भरला आहे. वांद्री मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी ४४.८२ मी असून पाणीसाठा ३५.९३ दलघमी इतका आहे. हे धरण देखील 100% भरले आहे. कुर्झे धरणाची पातळी ६८.८० मी. तर पाणीसाठा ३१.१५ दलघमी म्हणजेच ७९.७७ टक्के इतका आहे.
वसईकिनारी ६ मीटर उंचीच्या लाटा
वसई : वसईच्या विविध किनारपट्टीवर शनिवारी, रविवारी जवळपास ५.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून किनारपट्टीच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा पूर्वीच देण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले.
शनिवारी रात्री सोसाट्याचा वारा आणि त्यात मुसळधार पावसामुळे वसईतील किल्ला बंदर, पाचू बंदर, रानगाव , अर्नाळा किनारपट्टीजवळच्या घरांचे भरतीच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
वसई-विरारमध्ये शुक्र वारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारमधील जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये वसईतील विविध किनाºयावर खास करून अर्नाळा येथील गणपती रोड किनाºयावरील काही घरांच्या भिंतींची पडझड झाली आहे.
पाचू बंदर व किल्ला रोड येथील घरांना भेगा पडल्या, तर काहींच्या भिंती कोसळल्या आहेत. खाडीचा पाड्यात राहणाºया आदिवासींची ३५ ते ४० घरे पाण्याखाली गेली आहेत. या ठिकाणी साधारणपणे १५० लोकांची वस्ती असून शुक्र वार व शनिवारची संपूर्ण रात्र त्यांनी उंचवट्यावर बसून काढली. रविवारी दुपारी त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था तहसीलदारांतर्फे अर्नाळा जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली.
वसईतील नवघर माणिकपूर शहरात तर बहुतेक सोसायटीत व दुकानात पाणी साचले आहे. तर नवघर डेपो, १०० फूट रोड व वसईतील सनसिटी रस्ता ,मिठागरे वसाहत आणि पूर्वेस महामार्ग, शिरसाड तसेच तानसा नदीवरील पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे.
चौघांना सुखरूप बाहेर काढले
मनोर : मनोरजवळील करळगाव येथे तलाव राखणारे चार जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना रविवारी सायंकळी येथील ग्रामस्थांनी आपला जीव मुठीत घेऊन सुखरूप बाहेर काढले. नांदगाव येथील नंदनवनमध्ये अडकलेल्या कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलवले.
करळगाव येथे असलेल्या तलावातील मासे राखण्या साठी शैलेश सरोज, संतोष सरोज, मोहरम अली वय व दिलीप सरोज असे एकूण चार जण होते. शनिवारी रात्री अचानक पाणी त्यांच्या घराच्या चारही बाजूने शिरल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.
रविवारी संध्याकाळी ग्रामस्थांनी टायर टूपचा वापर करून सुखरूप बाहेर काढले. नांदगाव नंदनवन येथे बाबू भाई यांच्या कुटुंबियांना सुखरूप एका इमारतीच्या गच्चीवर हलवण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी गजरे, तहसीलदार महेश सागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली.