खचलेल्या बळीराजाचा प्रयत्न : विक्रमगडमध्ये भातशेती जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 05:52 AM2019-02-22T05:52:06+5:302019-02-22T05:52:24+5:30
खचलेल्या बळीराजाचा प्रयत्न : विक्रमगडच्या सजन, झडपोलीमधील शेतकऱ्यांच्या अपेक्षा
राहुल वाडेकर
विक्रमगड : गत हंगामात पावसाने दगाबाजी केल्याने उभी पीके करपल्याने खचलेल्या बळीराजाला उन्हाळी भाताने उभारी दिली आहे. सिंचनाच्या विशेष सुविधा उपलब्ध नसतानाही खरीपात भात लागवड होतेच परंतु, उन्हाळी हंगामातसुद्धा मुँहु खुर्द लघु पाटबंधाºयांच्या पाटाच्या पाण्यावर सजन, झडपोली गावात भात पिकाची लागवड करुन येथील प्रयोगशिल शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहे.
या वर्षी तालुक्यात गंभीर दुष्काळ आहे. त्यात या वर्षी पावसाने ओढ दिल्याने व ऐन भात पीक तयार होण्याच्या काळात पाऊस दीड महिना पडलाच नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचे भात पिकाचे ६० टक्के उत्पन्न घटल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. पिक कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बळीराजा असतानाच आपले मनोबल खचून न देता पुन्हा उभारी घेत झडपोली, सजन गावातील शेतकºयांनी न डगमगता उन्हाळी भात शेतीची लागवड केली आहे.
झडपोली, सजन गावातील प्रयोगशिल शेतकरी सेवक सांबरे, अंकुश सांबरे, नरेश सांबरे, शरद सांबरे, श्रीधर सांबरे, सुभाष सांबरे, रमेश सांबरे, नारायण सांबरे, मधुकर सांबरे, पंडित सांबरे अशा अनेकांनी आपल्या शेतात उन्हाळी हंगामात भाताचे पीक घेतले आहे. त्याकरीता त्यांनी आपल्या वर्षानुवर्ष भात लागवडीच्या अनुभवाच्या जोरावर लागवड केली आहे. आंदाज़े १२ ते १५ हेक्टर क्षेत्रावर शेतात सुधारीत पद्धतीने भात पिकाची रोपणी केली आहे. मुँहु खुर्द लघु पाटबंधाºयांच्या कालव्याद्वारे सजन, झडपोली गावाकडे येणारे
पाण्याच्या जोरावर ५ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान पेरणी करून आता भात पिकाची रोपणी पुर्ण झाली आहे. भात पिकाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करुन भाताचे अधिकाधिक उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे.
खरिपापेक्षा उन्हाळ्यात उत्पन्न जास्त
च्पावसाळी हंगामात जुलै व आॅगस्ट महिन्यात सुर्याची तिरपी किरणे असतात. याउलट उन्हाळी हंगामात भातपिकाच्या वाढीच्या काळात म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात लंबरुप किरणांमुळे सूर्यप्रकाश भरपूर असतो. त्यामुळे खतास प्रतिसाद जास्त असतो आणि उन्हाळी हंगामात उत्पादन जास्त मिळते. तसेच उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व
च्कमी आद्रतेच्या प्रमाणामुळे प्रतिकूल हवामानामुळे काही रोगाचे प्रमाण पावसाळी भात पिका पेक्षा काही प्रमाणात कमी राहते. उन्हाळ्यात पिकाचीं उंची पावसाळी पिकांपेक्षा कमी असते. तसेच, पावासाळी भातापेक्षा उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण अधिक असते. त्यातच या काळात तण व गवत नसल्याने भात भरघोस येणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
स्थानिक जातीची लागवड : उन्हाळी भात लागवडीसाठी स्थानिक जातींबरोबरच कर्जत १८४, कर्जत ३, कर्जत ४, रत्नागिरी, रत्ना, सह्याद्री, पालघर-१ आदी साडेतीन ते चार महिन्यात तयार होणाºया जाती वापर केला आहे.
या वर्षी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने गंभीर दुष्काळ आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले असुन पीक कर्जे कशी फेडायची ही चिंता शेतकºयांना असताना मोठी हिम्मत करून उन्हाळी भात पिकाची लागवड आम्ही केली आहे.
- सेवक सांबरे, शेतकरी, सजनगाव