‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा’ वसईत बोजवारा
By admin | Published: August 20, 2016 04:22 AM2016-08-20T04:22:45+5:302016-08-20T04:22:45+5:30
निकृष्ट दर्जाचे काम केल्याने कामण येथील देवकुंडी रस्ता वाहून गेला असून ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. अवघ्या तीनच वर्षात दोन कोटीचा रस्ता वाहून गेल्याने
वसई : निकृष्ट दर्जाचे काम केल्याने कामण येथील देवकुंडी रस्ता वाहून गेला असून ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. अवघ्या तीनच वर्षात दोन कोटीचा रस्ता वाहून गेल्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कामाबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे.
वसई तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या देवकुंडी या छोट्याशा आदिवासी पाड्यात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने देवकुंडी येथे जाणे-येणे अतिशय जिकरीचे होते. पावसाळ्यातील चार महिने तर नदी नाले ओलांडून अडीच किमीचा कच्चा रस्ता तुडवीत, घनदाट जंगलातून देवकुंडी पाड्यातील ग्रामस्थांना बाजारहाट करण्यासाठी कामण, पोमण येथे यावे लागत होते. तत्कालीन केंद्रीय मंत्री राम नाईक यांना देवकुंडी ग्रामस्थांना रस्त्याअभावी भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव झाली. वाजपेयी सरकारने ‘पंतप्रधान ग्राम सडक योजना’ सुरु केली होती. म्हणून देवकुंडी येथील आदिवासी ग्रामस्थांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून राम नाईक यांनी या योजनेचा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच २०१३ मध्ये या योजनेतून २ कोटी ८ लाख ३६ हजार २५८ रुपयांचा निधी मंजूर होऊन या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. परंतु ठेकेदारावर कोणाचाच अंकूश नसल्याने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. सध्या हा रस्ता पुर्णपणे उखडून गेला आहे. नदीवर बांधलेल्या पूलावरील सळ्या उघड्या पडल्या.
देवकुंडी पाड्याशेजारुन प्रसिध्द कामण दुर्ग किल्ल्यावरून नदी वाहते. रस्ता झाल्याने आता शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. परंतु रस्ता अनेक ठिकाणी फुटल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनत चालला आहे. तर दुसरीकडे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. तर एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणामुळे चारशे मिटरच्या रस्त्याचे काम थांबले आहे.