बाइक अॅम्ब्युलन्स ठरतेय वरदान, २ महिन्यांत ७५ रुग्णांना मिळाले जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 06:02 AM2018-10-05T06:02:00+5:302018-10-05T06:02:55+5:30
योजना ठरली वरदान : जव्हार तालुक्यात दोन महिन्यात
हुसेन मेमन
जव्हार : आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यात सुरू केलेल्या बाईक अॅम्ब्युलन्समुळे या तालुक्यातील ७५ रुग्णांचे प्राण वाचले आहे. ही सेवा सेवा पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागाकरीता उपलब्ध करून दिली आहे. दुर्गम भागात तातडीने रूग्णसेवा मिळण्यासाठी याचा फायदा येथील रूग्णांना होत असून अवघ्या दोन महिन्यात जव्हार तालुक्यातील नांदगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाईक अॅम्ब्युलन्सने ७५ विविध रूग्णांची मदत केली तर पालघर जिल्ह्यात २५० रूग्णांना मदत केलेली असल्याची माहिती १०८ अॅम्ब्युलन्स चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. खान यांनी दिली आहे.
जव्हार तालुक्यातील नांदगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या एकमेव अॅम्ब्युन्सने तालुक्यात ७५ तर जिल्ह्यात २७५ रूग्णांची तपासणी करून तातडीचे उपचार यशस्वी केलेले आहेत. त्यामुळे बाईक अॅम्ब्युलन्सची खूपच गरज याभागात असल्याचे स्पष्ट झाले असून ती ग्रामीण भागासाठी वरदान ठरली आहे. मात्र, तालुक्याची लोकसंख्या पाहता किमान ३ बाईक अॅम्ब्युलन्स येथे असणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून याचा ग्रामीण भागाला खूपच फायदा होणार आहे. तालुक्यात चारीही बाजुला अतिदुर्गम भाग असल्याने किमान तीन बाईक असणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यांची संख्या वाढवावी अश्ी मागणी होत आहे.
अशी मिळेल आपल्याला १०८ अॅम्ब्युलन्स
१०८ क्रमांकावर प्रथम फोन केल्यावर हे कॉल अॅम्ब्युलन्स व बाईक अॅम्ब्युलन्स दोंघांना कॉलसेंटर द्वारे जातात, तेथून अपघाताची किंवा अत्यावश्यक उपचाराकरीता माहिती घेतली जाते, त्यानुसार २५ ते ३० किलोमिटर दरम्यान रूग्णाला किती तातडीने उपचार देणे आहे.
च्हे फोन वर दिलेल्या माहितीवरून डॉक्टरांना कळविले जाते, त्यानुसार बाईक अॅम्ब्युलन्स घेऊन उपलब्ध बी. ए. एम.एस. डॉक्टर थेट रूग्ण असलेल्या ठिकाणावर पोहोचतात व प्रथमोपचार केल्यानंतर मागून येणाऱ्या रूग्णवाहिकेसोबत उपचाराकरीता शासकिय रूग्णालयात दाखल करतात.