नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 12:42 AM2019-08-14T00:42:37+5:302019-08-14T00:43:35+5:30
किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे.
पालघर : किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे. यावेळी समुद्रात मासेमारीला गेलेल्या आमच्या धन्याचे रक्षण करून ‘बोटीला भरपूर मासे मिळू दे’, अशी प्रार्थना यावेळी करण्यात येणार आहे.
मासेमारी बंदी कालावधी सुरू झाल्यानंतर किनारपट्टीवरील सर्व मासेमारी बंदी होते. सर्व मच्छीमार आपल्या बोटी किनाºयावर नांगरून ठेवतात. पावसाळी बंदीचा कालावधी उलटून गेल्यानंतर मासेमारी हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी किनारपट्टीवरील कोळीवाड्यात गावागावातून सोने रुपी नारळाची तयारी करून तरु ण - तरु णी, महिलावर्ग लुगडे नेसून तर पुरु ष वर्ग कंबरेला रुमाल, डोक्यावर टोपी असा पेहराव करून समुद्राला नारळ अर्पण करायला जात असतात. यावेळी सर्व भागात उत्साहाचे वातावरण असते. काही गावात कोळीगीतांचे कार्यक्रम आयोजित करीत असतात. मुरबे, सातपाटी, केळवे, दांडी, नवापूर, तारापूर, डहाणू, चिंचणी आदी भागात मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जातात. काही वर्षांपूर्वी नारळीपौर्णिमा किंवा १५ आॅगस्ट यापैकी पहिला दिवस येईतो मासेमारी बंदी होती.
मासेमारी बंदी कालावधी ९१ दिवसांचा असावा
मंत्रालयीन पातळीवर काही अधिकाऱ्यांना खाजगी भांडवलदार मच्छीमारांकडून चुकीची माहिती पुरवल्याने महाराष्ट्र शासनाने आता १ जून ते ३१ जुलै अशी अवघ्या ६१ दिवसाचा अत्यल्प असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केल्याचे मच्छीमार संघटनांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील बहुतांश मच्छीमारांनी १५ मे ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपर्यंत ९१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी घोषित करावा अशी मागणी रेटून धरली आहे. परंतु शासन पातळीवरून अद्याप त्याचा विचार झालेला नाही.