आदिवासी बांधवांची आगोटाची तयारी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:04 AM2019-06-09T00:04:19+5:302019-06-09T00:04:35+5:30
संडे अँकर । बाजारपेठेत प्लास्टिक व दोर, पावसाळ्याच्या शिधाखरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, घरांची दुरुस्ती
जव्हार : जव्हार हा ९९ टक्के आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका असून, दिड लाख लोकसंख्या आहे. खेडोपाड्यातील बहुतांश घरे कुडा विटामातीची असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही घरावर टाकण्यासाठी, गाय-गोठ्यासाठी, पावसाळ्यात चुलीसाठी लागणाऱ्या लाकूड साठा, प्लास्टीक किंवा ताडपत्री खरेदीसाठी जव्हारमध्ये सध्या जोरदार गर्दी होते आहे. तसेच येथील आदिवासी बांधव घरावरील कौलांची दुरुस्ती करतांना दिसत आहेत.
उन्हाचे चटके इतके जोरात बसू लागले आहेत की, आता पाऊस लवकरच होणार अशी चाहूल लागली असल्याने, जव्हार येथे बाजारपेठेत घरावरील कौलांवर अंथरण्यासाठी, लाकडाच्या झोपडीवर कुडाच्या घरावर तसेच गायगोठ्यांच्या अवती-भवती बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कापड लागते ते जव्हारच्या बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. परिसरांतील आदिवासी बांधव पावसाळ्यांत पाण्याची गळती घरात होऊ नये म्हणून खुप मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कापडाची खरेदी करतांना दिसत आहेत. प्लासटीकमध्ये काळे प्लास्टीक हे सर्वात स्वस्त ६५/- ते ८५/- रुपये प्रति किलो आहे. त्याचा पन्हा (रूंदी) १५ ते २० फुटाचा असतो, निळे, पिवळे किंवा पांढºया कलरचे देखील प्लास्टीक बाजारपेठेत मिळते. तसेच प्लास्टीकच्या घोंगड्याचेही चलन येथे मोठ्या प्रमाणात आहे. घोंगड्यांच्या उपयोग भर पावसांत शेतात लावणी करतेवेळी होत असतो. शिवाय निळ्या रंगाच्या प्लास्टीक ताडपत्र्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. निळी ताडपत्री ही जाड असल्यामुळे टिकाऊ असते, यात ४ फुटी. ६ फुटी, ८ फुटी, १२ फुटी पन्हा असतो. या ताडपत्र्या मिटरमध्ये विकल्या जात आहेत. जव्हार प्लास्टीक कापडाच्या आणि छत्र्यांच्या बाबतीत मोठी बाजारपेठ असून येथे पावसाळ्याच्या सुरवातीला म्हणेज फेब्रुवारी मार्चपासून मोठे व्यापारी लाखो टन प्लास्टीक कापडाची खरेदी करून साठा करून ठेवतात व त्यांची सिझनला विक्री होत असते. घाऊक स्वरूपाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया जव्हार मधुन आसपासच्या तालुक्यांतील, खेडोपाड्यातील व्यापारी प्लास्टीक कापड व छत्र्यांची खरेदी करीत असतात.
कडाक्याचा उन्हाळा व शाळेच्या सुट्ट्या आता अंतिम टप्प्यांत असून असह्य उन्हाबरोबरच हव्याशा वाटणाºया शालेय सुट्ट्या देखील आता लवकरच संपणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक या सर्वांना शाळेचे वेध लागले आहे. सध्या विद्यार्थी जगतात दप्तर, पुस्तके, नवीन शाळेचे गणवेश, शालेय साहित्य, बुट, रेनकोट, छत्र्यां या सारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत हालचाली सुरू झाल्या आहेत.