आदिवासींच्या बांबू हस्तकलेचे राष्ट्रपतींना कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:36 PM2020-02-26T22:36:12+5:302020-02-26T22:36:21+5:30
महिला कलाकारांची केली प्रशंसा; दुर्गम भागात उपलब्ध होतो रोजगार
विरार : बांबूपासून शोभेसह गृहोपयोगी वस्तू बनवत संस्थेच्या माध्यमातून त्या विकून आपल्या पतीसह संसाराचा गाडा हाकणाऱ्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी तसेच गरजू महिलांच्या हस्तकलेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भुरळ पाडली. या हस्तकलेचे राष्ट्रपती तसेच राज्यपालांनी कौतुक केले असून या महिलांना दुर्गम भागात रोजगार उपलब्ध करून देणाºया ‘विवेक’ या संस्थेच्या कार्याचीही प्रशंसा केली आहे.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी तसेच गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर अनेक वर्षांपासून काम करत आहे. या महिलांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने त्यांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर महिला आता २१ प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करतात. त्यात ट्रे, आकाश कंदील, मोबाइल होल्डर, राख्या, फ्रुट बास्केट, पेपरवेट, टी कोस्टर यांसारख्या आकर्षक वस्तूंचा समावेश आहे. सदर उत्पादने ही उच्च प्रतीची आणि दर्जेदार असल्याने त्यांना मागणीही भरपूर असते.
जिल्ह्यातील महिलांनी बनवलेल्या या बांबूच्या पर्यावरणपूरक आकर्षक वस्तू विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पुणे येथील राजभवनात भेटी दाखल दिल्या होत्या. यावेळी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक प्रदीप गुप्ता, व्यवस्थापक लुकेश बंड, प्रशिक्षण आणि विकास अधिकारी प्रगती भोईर तसेच वनवासी भगिनी निर्मला दांडेकर, वैशाली दांडेकर, प्रतीक्षा गोवारी व सुरेखा जाधव या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यासमोर उपस्थित होत्या.
राष्ट्रपती कोविंद यांनी या बांबू हस्तकलेचे कौशल्य पाहून वनवासी भगिनींचे मोठे कौतुक केले. तसेच त्यांना हस्तकलेमार्फत रोजगार मिळवून दिल्याबद्धल विवेक सेंटरच्या कायार्ची प्रशंसा केली. त्याचबरोबर पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या वनवासी भगिनींच्या मार्फत तयार करणाºया वस्तूंचा अधिकाधिक उपयोग करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी केले.