प्रधानमंत्री आवास योजना फसवी?; लाभार्थी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 12:56 AM2019-09-27T00:56:41+5:302019-09-27T00:57:10+5:30

गरिबांची स्वप्नांतील घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

Prime Minister's Housing Scheme Cheat? | प्रधानमंत्री आवास योजना फसवी?; लाभार्थी हतबल

प्रधानमंत्री आवास योजना फसवी?; लाभार्थी हतबल

googlenewsNext

- हितेन नाईक

पालघर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अत्यल्प उत्पन्न घटकासाठी परवडणाऱ्या घरांच्या योजनेतून जिल्ह्यातील बोईसर आदी भागात नोंदणी करणाºया लाभार्थ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनाचे अनुदानच जमा झालेले नाही. बँकांनी अनुदानाच्या रकमा कर्जामध्ये जमा केल्याने लाभार्थ्यांसह ही योजना राबविणारे बिल्डर अडचणीत सापडले आहेत. पंतप्रधानांची ही योजना फसवी असल्याची ओरड आता जिल्ह्यातून होऊ लागली आहे.

‘सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना विशेषरित्या नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत) क्षेत्रासाठी लागू केली आहे. चार घटकांमध्ये समाविष्ट असलेल्या या योजनेतल्या लाभार्थ्यांना संलग्न व्याज आणि अनुदान माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकासाठी परवडणाºया घरांची निर्मिती करण्यात येणार होती. त्यासाठी कमी व्याजदरावर १५ वर्षांसाठी बँका आणि गृहनिर्माण कंपन्या (बिल्डर) यांना कर्ज उपलब्ध करण्यात येणार होते. कमी व्याजदर म्हणजे ६ लाखापर्यंत ६.५० टक्के इतका राहणार असून १५ वर्षाचा कालावधी लक्षात घेऊन सदर व्याज अनुदानाची सध्याची किंमत (नेट प्रेझेंट व्हॅल्यू) संबंधित बँकांकडे केंद्र शासकीय यंत्रणेमार्फत थेट जमा करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. नगरपालिका क्षेत्रामध्ये जमिनीच्या बाजारमूल्याचा भाव (रेडी रेकनर) जास्त असल्याने घरांचे भाव वाढत होते. अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे नगरपालिका क्षेत्राबाहेरच्या (ग्रापंचायत) भागात अशी गृहसंकुले निर्माण करण्याचे काम काही बिल्डरांनी हाती घेतले. आपली साठवून ठेवलेली पुंजी, बँकांकडील कर्जाची रक्कम आणि केंद्र शासनाच्या अनुदानाच्या भरवशावर लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील बोईसर आदी भागातील अल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांनी ठरवले. आणि त्यानुसार पास्थल, सरावली, कुरगाव, परनाळी आदी भागात ८ ते १२ लाखांत स्वत:चे घर मिळणार असल्याने या गृह प्रकल्पात घरांची नोंदणीही करून टाकली.

हा लाभ घेताना लाभार्थ्यांनी एचडीएफसी, आयडीबीआय आदी बँकांकडे कायदेशीर प्रस्तावांची पूर्तता करून दिल्यानंतर बँकांनीही त्यांच्या कर्ज आणि अनुदानाच्या प्रस्तावाला केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मान्यता देत त्यांच्या रकमा बिल्डरांच्या खात्यात जमा केल्या. काही कालावधीनंतर केंद्र शासनाकडून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणाºया अनुदानाच्या रकमा मुदत संपूनही जमा होत नसल्याने बँकांनी ग्राहक असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यातील अनुदानाची सुमारे २ लाख ६७ हजारांच्या रक्कम थेट त्यांच्या कर्जामध्ये जमा केली.

एवढेच नव्हे तर त्याच्यावर व्याज लावून वसुलीही सुरू केली आहे. त्यामुळे शेकडो लाभार्थी हतबल झाले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे.
एवढ्या मोठ्या रकमेचा बोजा अंगावर पडल्याने त्यांच्या संसाराचा डोलारा डगमगू लागला असून ही एवढी मोठी अतिरिक्त रक्कम भरायची कुठून असा आर्त सवालही ही गरीब कुटुंबे विचारू लागली आहेत. तर दुसरीकडे ज्या बिल्डरांनी मोठ्या गृह संकुलांची उभारणी करून अशा गरीब लाभार्थ्यांच्या घरांची नोंदणी केली आहे, त्या बिल्डरमध्ये देखील भीतीवजा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

सकारात्मक प्रयत्न हवेत
बोईसर भागात हजारो रहिवासी प्रकल्प उभे राहत असून लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याच्या दृष्टीने राष्टिÑयीकृत बँका, खाजगी बँका आणि काही खाजगी वित्तीय संस्थाही प्रयत्न करीत आहेत. शासनाने या संदर्भात सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर एका खाजगी वित्तीय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

पंतप्रधान आवास योजनेच्या या भूमिकेने बांधकाम व्यावसायिक द्विधा मनस्थितीत असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करणे गरजेचे झाले आहे.
- पवन सिंग ठाकूर,
ठाकूर आयकॉन

बोईसर हा ग्रामीण भाग असल्याने लाभार्थ्यांनी सादर केलेले प्रस्ताव हे शहरी भागाकरिता असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बहुधा त्यांचे प्रस्ताव नाकारले असावे.
- माणिक दिवे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर)

Web Title: Prime Minister's Housing Scheme Cheat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.