व्हॉट्सअपवर फोटो टाकून अतिरेकी असल्याचा केला प्रचार
By admin | Published: September 27, 2016 06:59 PM2016-09-27T18:59:27+5:302016-09-27T18:59:27+5:30
विरारमधील सोसायटीमधील वादातून एका इसमाला अतिरेकी ठरवून त्याचा फोटो व्हॉटसअॅपवर पसरवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 27 - विरारमधील सोसायटीमधील वादातून एका इसमाला अतिरेकी ठरवून त्याचा फोटो व्हॉटसअॅपवर पसरवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. यामुळे मी अतिरेकी नाही असा फलक घेऊन या कुटुंबियांनी विरार पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली.
सईद खान विरारच्या गोपचर पाडा येथे राहतात. त्यांच्या सोसायटीत वाद आहे. या वादातून मला अतिरेकी ठरवून माझी बदनामी केली जात असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. २२ सप्टेंबर रोजी माझे छायाचित्र व्हॉटसअॅपवर टाकून मी अतिरेकी असल्याचे पसरवले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी सोसायटीमधील काही रहिवाशांचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे माझे नाव खान आहे मी अतिरेकी नाही अशा आशयाचे फलक घेऊन खान यांनी कुटुंबियांसह विरार पोलीस ठाण्यात निदर्शने केली. याबाबतची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. या छायाचित्रामुळे लोकं माझ्याकडे संशयाने पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
याच वादातून काही दिवसांपुर्वी माझा टेम्पो जाळल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पोलिसांनी अद्याप कुणाविरोधातही गुन्हा दाखल केलेला नाही.