झापच्या दारुबंदीला घटस्थापनेचा मुहूर्त, बचत गटातील महिलांसह ग्रामस्थांचा मोठा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 03:15 AM2017-09-22T03:15:51+5:302017-09-22T03:15:54+5:30
तालुक्यातील झाप गावातील ग्रामस्थांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर दारू ओतून व नारळ फोडून दारूबंदीचा निर्धार केला आहे. यात बचत गटातील महिलांचा मोठा सहभाग आहे.
हुसेन मेमन
जव्हार : तालुक्यातील झाप गावातील ग्रामस्थांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर दारू ओतून व नारळ फोडून दारूबंदीचा निर्धार केला आहे. यात बचत गटातील महिलांचा मोठा सहभाग आहे.
तालुक्यातील झाप ग्रामपंचायत हद्दीत दारूचे व्यसन वाढले होते. दमण दारू व गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात होती. ही ग्रामपंचायत शंभर टक्के आदिवासी आहे. अनेकजण दारूच्या व्यसनाधीन झाल्याने त्यांची कुटुंबे देखील उध्वस्त झाली होती, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील दारू विक्रीला आळा बसावा म्हणून, आदिवासी महिला बचत गटांनी पुढाकार घेवून दारूबंदीचा निर्णय घेतला आहे.
या ग्रामपंचायत हद्दीत झाप, धंडपाडा, वाघेचीवाडी, चिंचवाडी, भोकरीपाडा, नावापाडा, हेदोली, दळणेचापाडा, वडपाडा असे ९ गाव पाडे असून, या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३ हजार ४५० आहे. मात्र दारूचीबंदी असतांनाही झाप ग्रामपंचायतीत दिवसेंदिवस दारू विक्रीचे व दारू पिणा-यांचे प्रमाण वाढत चालले होते. अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले होते. त्यातच वाद, भांडणे व्हायची. यामुळे ग्रामस्थांनी दारू बंदीचा निर्णय घेतला आहे.
झाप ग्रामपंचायत हद्दीत दमण दारूची व हातभट्टीची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे येथील महिलांनी सांगितले. तसेच वाद, भाडंण, तंटे रोजच व्हायची याचा त्रास महिला व मुला बाळांना व्हायचा हे लक्षात घेवून, या ग्रामपंचायतीत महिला एकत्र येऊन दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संपूर्ण गावकरी स्वेच्छेने राबविणार आहे. तसेच जो कोणी ही बंदी मोडेल, त्याला अनुरुप अशी शिक्षाही केली जाणार आहे. आता त्याची अंमलबजावणी कशी होते. याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.