चिकू बागायतींना फळपीक विम्याचे संरक्षण
By admin | Published: July 10, 2016 12:29 AM2016-07-10T00:29:58+5:302016-07-10T00:29:58+5:30
गेल्या दोन वर्षांपासून वंचित असलेल्या चिकू फळाला शासनाने अखेर पीक विम्याचे संरक्षण कवच दिले आहे. पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना चालू वर्षातील मृग
- अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डी
गेल्या दोन वर्षांपासून वंचित असलेल्या चिकू फळाला शासनाने अखेर पीक विम्याचे संरक्षण कवच दिले आहे. पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना चालू वर्षातील मृग बहाराकरिता असून, कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची आहे. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर योजना लागू झाल्याने, पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेंंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना सन २०१६ च्या मृग बहाराकरिता चिकू फळाला लागू करण्यात आली आहे. यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत भरपाई दिली जाणार आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत हवेतील सापेक्ष आर्द्रता ९० टक्केपेक्षा जास्त सलग पाच दिवस राहिल्यास पंचवीस हजार रुपये आणि सलग दहा दिवस राहिल्यास पन्नास हजार रु पये देय राहील.
दरम्यान, २०१३ साली चिकू फळाला पीक विम्याचे संरक्षण मिळाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभूनही, दोन वर्षांपासून विम्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. याकरिता महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाने शासनदरबारी पाठपुरावा केला मात्र, नैराश्य आले. अखेर पंतप्रधानांना साकडे घातल्यानंतर यश मिळाल्याचे महाराष्ट्र चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी सांगितले.
अडीच हजारांचा प्रति हेक्टरी हप्ता; १२ जुलैची अंतिम मुदत
- शेतकऱ्यांना २,५०० रुपये विमा हप्ता (प्रतिहेक्टर) भरावयाचा आहे. शेतकऱ्यांनी प्रस्ताव पत्रक भरून रोख विमा रक्कम स्वत:चे खाते असणाऱ्या बँक शाखेत १२ जुलै या अंतिम मुदतीत भरायची असून, याकरिता कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग अनिवार्य करण्यात आला आहे.
- पालघर जिल्ह्यात साडेसात हजार हेक्टर क्षेत्र चिकू बागायतीने व्यापले असून, त्यापैकी डहाणू तालुक्याचा वाटा साडेचार हजार हेक्टरचा आहे. त्यामुळे चिकू बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
२०१३ सालानंतर चिकूला फळ पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले. शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाने विम्याचे कवच प्राप्त झाल्याने चिकू उत्पादक आनंदी झाले आहेत.
- विनायक बारी,
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ.
फळ पीक विम्याचा लाभ तालुक्यातील अधिकाधिक चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा. या योजनेमुळे बागायतदार व शेतकऱ्यांचे सांभाव्य नुकसानी पासून संरक्षण होईल.
- आर.यू. ईभाड,
कृषी अधिकारी, डहाणू.