बुलेट ट्रेनसंदर्भातील जनसुनावणी गुंडाळली; पर्यावरण संस्था संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 11:12 PM2019-11-19T23:12:10+5:302019-11-20T06:25:46+5:30
प्रकल्प रद्द करण्याची मागणी
वसई : बहुचर्चित मुंंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ज्यांच्या जमिनी अधिग्रहित होऊन ज्यांना नोटीस देण्यात आली आहे, त्यांच्यासाठी मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पर्यावरण संवर्धन समिती, भूमिपुत्र बचाव संघटना आदी संस्थांना त्याची काहीच कल्पना नसल्याने त्यांनी याला प्रचंड विरोध करत ही सुनावणी गुंडाळली.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन’ संदर्भातील जनसुनावणी मंगळवारी सकाळी ११ वाजता वसई पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याची माहिती पर्यावरण संवर्धन समिती, भूमिपुत्र बचाव संघटना आणि इतर नागरिकांना मिळताच तेही तेथे हजर झाले. कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे ती पुन्हा एकदा गुंडाळण्यात आली.
जनसुनावणीची कोणतीही माहिती आम्हाला न देता शासन आमची सपशेल दिशाभूल करीत असल्याची संतप्त प्रतिक्रि या संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली. या जनसुनावणीस सामोरे जाताना पर्यावरण संवर्धन समिती समन्वयक समीर वर्तक यांनी बुलेट ट्रेन आमच्या हिताची नसल्याचे सांगितले. तसेच कुणालाही न सांगता जनसुनावणी ठेवलीच कशी? बुलेट ट्रेनसाठी जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका याआधीही आम्ही घेतली असताना आता पुन्हा अशा सुनावण्या घेऊन सरकारला काय साध्य करायचे आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. म्हणूनच ही जनसुनावणी रद्द करण्याचे आवाहनही केले.
उपस्थित आदिवासी एकता परिषद पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष दत्ता सांबरे यांनी आदिवासी समाजाला त्रास देऊ नका असे सांगत बुलेट ट्रेनला विरोध केला. तसेच उपस्थित बाधित शेतकऱ्यांनीही जमीन देण्यास विरोध केल्याने उपजिल्हाधिकाºयांनी सर्वांचा बुलेट ट्रेनला विरोध आहे, असे नमूद करून शेवटी ही जनसुनावणी संपविली. जनसुनावणी नंतर भूमिपुत्र बचाव आंदोलन, पर्यावरण संवर्धन समिती आणि आदिवासी एकता परिषदेतर्फे बुलेट ट्रेन रद्द करा या मागणीची पत्रेही उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या जनसुनावणीसाठी वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे, वसई तहसीलदार किरण सुरवसे तसेच पर्यावरण संवर्धन समितीतर्फे फारूक मुल्ला, विक्रांत चौधरी, अभिजित घाग, दर्शन राऊत, आदिवासी एकता परिषदेच्या वसई तालुका उपाध्यक्ष वंदना जाधव व पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कुलदीप वर्तक, स्वाभिमानी वसईकरचे रॉजर परेरा आणि विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.
वसई पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेली बुलेट ट्रेन संदर्भातील जनसुनावणी ही नियम १६ क नुसार ज्यांच्या जमिनी जात आहेत आणि ज्या धारकांना तशा नोटिसी देण्यात आल्या आहेत, त्यांच्यासाठी होती. तर संवर्धन समिती आणि भूमिपुत्र संघटना यांनी म्हटले की, आम्हाला बुलेट ट्रेन नको. वास्तविक, हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे, तरीही आम्ही सुनावणीवेळी समिती आणि संघटना प्रतिनिधीचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे सभा उधळून लावली असे म्हणणे संयुक्तिक नाही.
- स्वप्नील तांगडे, वसई उपविभागीय अधिकारी