पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा जिल्ह्यात सर्वत्र निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:25 AM2019-02-16T00:25:21+5:302019-02-16T00:25:29+5:30
काश्मिरातील पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड हल्ला करुन जवानांना शहीद करणाऱ्या घटनेचा शुक्रवारी पालघर जिल्हावासियांनी तिव्र संताप व्यक्त करुन घटनेस जबाबदार असणा-या पाकिस्तानचा कडकडीत निषेध व धिक्कार केला.
पालघर : काश्मिरातील पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड हल्ला करुन जवानांना शहीद करणाऱ्या घटनेचा शुक्रवारी पालघर जिल्हावासियांनी तिव्र संताप व्यक्त करुन घटनेस जबाबदार असणाºया पाकिस्तानचा कडकडीत निषेध व धिक्कार केला. देशावरील या हल्ल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापसातील हेवेदावे सोडून एकत्र आलेले पहावयास मिळाले. जागोजागी पाकी पंतप्रधान व ध्वज जाळण्यात आले. यात विविध कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी व महिला सामिल झाल्या होत्या. सर्वत्र पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या जात होत्या.
वाड्यात सेनेकडून पाकी दहशतवादी हल्ल्याचा निषेध
वाडा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा देशात सर्वत्र निषेध होत असताना शुक्रवारी वाड्यातील शिवसैनिकांनीही पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा व पाकिस्तानी झेंडा जाळून आपला संताप व्यक्त केला आहे.
भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्याचा निषेध म्हणून शिवसेना वाडा शहर व तालुका संघटनेच्या वतीने शुक्र वारी वाडा बस स्थानकाजवळ पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचा हार घालून व पाकिस्तान विरोधी घोषणा देत पुतळा जाळला. यावेळी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या निषेध कार्यक्र मादरम्यान बस स्थानक व परिसरातील शेकडो नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी उत्स्फूर्तपणे निषेध करण्यासाठी सहभागी झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, उप जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, तालुका सम न्वयक प्रकाश केणे, सचिव निलेश पाटील, शहर प्रमुख नरेश चौधरी, माजी तालुका प्रमुख प्रकाश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटक संगिता ठाकरे आदी उपस्थित होते.
विक्रमगडमध्ये शहिदांना श्रद्धांजली : काश्मिरातील पुलावाम येथे गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये भारतीय जवान शहिद झाल्याने विक्रमगडवासियांमध्ये संतापाची भावना होती. त्याचा निषेध म्हणून शुक्रवारी शहरातील मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमामध्ये पंचायत समिती कार्यालय, शिवसेना, भाजपा, काँग्रेस, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, हायस्कूल, व्यापारी असोसिएशन, कृषी कार्यालय, कस्तुरबा गांधी विदयालय येथील विद्यार्थी, कर्मचारी व नागरीकांनी भाग घेतला.
दहशतवादी हल्ल्याचे वसईत पडसाद
वसई : काश्मीर खोºयात पाकिस्तानी अतिरेक्यांनी घडविलेल्या घातपाताच्या निषेधार्थ वसई तालुका व पालघर जिल्हा शिवसेनेच्यावतीने शुक्र वारी वसईतील मुख्य चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या झेंड्याची होळी करु न पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
जम्मूहून श्रीनगरच्या दिशेने निघालेल्या सीआरपीएफ जवानांची बस अवंतीपुरा येथे आल्यावर अतिरेक्यांनी आयईडी चा स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शिवसेना वसई तालुका व जिल्हा पालघर यांच्या वतीने वसईत आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्या समवेत शेकडो शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. अगदी यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमेला चप्पलेने मारले आणि झेंडा जाळून आपला निषेध व्यक्त केला.
सेनेकडून आज जव्हार बंदची हाक
जव्हार- येथील गांधी चौक येथे पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने पाकिस्तान मुर्दाबाद व पाकिस्तान चा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. शनिवारी संपूर्ण जव्हार बंद करण्याचे आव्हान करण्यात आले आहे, यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, अर्षद कोतवाल, परेश पटेल, श्रावण खरपडे, नगरसेवक आदी उपस्थित होते. यावेळी नागरीकांनी एैक्य दाखविले.
पालघरमध्ये हिंदू-मुस्लिमबांधव एकत्र येत जला दो, जला दो, पाकिस्तान को जला दो... अशा घोषणा
पालघर- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शाहिद झालेल्या सीआरपीएफ च्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज दुपारी हुतात्मा स्तंभा जवळ पाकिस्तानचा प्रतीकात्मक ध्वज आणि अतिरेक्यांचा पुतळा जाळण्यात आला.
जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा शुक्रवारी पालघर येथील हुतात्मा चौकात सर्वपक्षीय निषेध करण्यात आला. यावेळी शहिदांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आल्या नंतर पाकिस्तानचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व सामान्य नागरिक तसेच पालघर मशिदीचे इमाम मुस्लिम समाजही माठ्या संख्येने सहभागी झाला होता.
आतंकवादी जिथे दिसतील तिथे त्यांना ठार करा व या हल्ल्याचा बदला घ्या, अशी मागणी यावेळी नागरिकांसह पालघरचे आमदार अमति घोडा यांनी केली. मुस्लिम समुदायानेही हातात तिरंगा ध्वज घेऊन देशावरील या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बॅनर फडकवून आपल्या भावनांना वाट करुन दिली. विद्यार्थ्यांनीही या श्रद्धांजली सभेत सहभागी होऊन हल्ल्याचा निषेध केला
बोईसरला विविध पक्षांनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली
बोईसर : जैश-ए-मोहम्मद ने सीआरपीएफ जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा शुक्रवारी शिवसेना व मनसेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणांबरोबरच पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसेनेचे पदाधिकारी निलम संखे व मुकेश पाटील यांनी आयोजित केलेल्या या निषेधाच्या कार्यक्र मास सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रभाकर राऊळ, जगदीश धोडी, मेघन पाटील आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दहशतवादी हल्ल्याचा तलासरीत निषेध
तलासरी : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तलासरीत शिवसैनिकांनी पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवदाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. तलासरी बाजारपेठेतून शिवसेनेचे पालघर जिल्हा संघटक श्रीनिवास वणगा , विजय माळी, राजू डोंबरे, हरिष पाटकर, इत्यादिसह अनेक शिवसैनिकांनी दहशतवाद्याच्या प्रतिकृतीची धिंड काढून त्याचे तलासरी नाक्यावर दहन केले. या वेळी दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त करून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
मनोर येथे सर्वपक्षीय रॅली काढून, तर मुस्लिमांनी नमाजनंतर केला निषेध
मनोर: पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षीय व हिंदू-मुस्लिम समाजच्या नागरिकांनी रॅली काढून निषेध व्यक्त केला. तर मुस्लिम समाजाने शुक्र वारची नमाज अदा करून निषेध रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी शहीद झालेले जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौका , मनोर नाका येथून तर मनोर पोलीस ठाण्याच्या मार्गावर शाळकरी विद्यार्थी व शिक्षकांनी या हल्ल्याचा निषेध केला. दुसरी रॅली मनोर मशिद ते मनोर नाका बाजारापर्यंत आल्यानंतर सर्वांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.