विरारमध्ये प्युरिफाइड वॉटर शौचालयाच्या टाकीतून, अनधिकृत पाणीविक्रेत्याच्या प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 03:28 AM2018-11-06T03:28:36+5:302018-11-06T03:31:12+5:30
विरार येथील एक अनधिकृत पाणी विक्रेता ‘ प्यूरिफाईड वॉटर’ अर्थात शुद्ध पिण्याचे पाणी चक्क शौचालयात ठेवलेल्या टाकीतून भरताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.
नालासोपारा - विरार येथील एक अनधिकृत पाणी विके्रता ‘ प्यूरिफाईड वॉटर’ अर्थात शुद्ध पिण्याचे पाणी चक्क शौचालयात ठेवलेल्या टाकीतून भरताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. ते पाणी तो मोठ्या जारमध्ये भरुन विकत असल्याचे शुक्र वारी उघडकीस आला आहे. या बाबत त्याला जाब विचारल्यावर त्याने हात वर करुन हे पिण्याचे पाणी नसल्याचा कांगावा केला.
विरार पूर्वेच्या मोरगाव येथील वृंदावन इमारतीमध्ये मोहोम्मद गनी (५०) नावाचा पाणी विक्रेता आहे. हा महाशय टँकरद्वारे पाणी विकत घेतो. या पाण्याचासाठा करण्यासाठी त्याच्या कडे चार टाक्या आहेत. यातील दोन टाक्या या शेजारी असलेल्या दुकानातील शौचालयात ठेवण्यात आल्या आहेत. तेथून पंप व पाईपद्वारे पाणी खेचून त्याची रस्त्यावरच विक्री केली जाते.
अनेक जण येथून बाटल्या, गॅलन, भांडी भरून घरी नेतात. परिसरात पाण्याची टंचाई असल्याने अनेक ग्राहक येथून पाणी विकत घेतात. मात्र ते पाणी शौचालयाच्या पाण्याच्या टाकीतून येत असल्याने हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ असल्याने कारवाईची मागणी होत आहे. वसई-विरार शहरात भीषण पाणी टंचाई असल्याने येथील अनेक चाळी, औद्योगिक वसाहतीत पॅकेजिंग मिनरल वाटरच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात अशुद्ध पाणी विक्र ीचे गोरखधंदे सुरू आहेत. २ रुपयांपासून १५ रु पयांच्या दराने हे पाणी विकले जाते. बोअरिंगचं, टँकरचं किंवा विहिरीचं पाणी सेन्टॅक्सच्या टाकीत साठवून त्यात केमिकल मिक्स करून त्याची विक्र ी केली जाते.
काळजी घ्या!
असं निकृष्ट दर्जाचं पाणी प्यायल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यांना डायरिया, किडनीचे आजार होतात. नागरिकांनी या बाबत सावध राहायला हवं. - डॉ. सई राघवन
आम्ही पाणी आंघोळीसाठी विकतो.तसा बोर्ड लावण्यात आला आहे. लोक त्याचा कशासाठी वापर करतात ते आम्हाला माहीत नाही.
- मोहोम्मद गनी, पाणीविक्रेता