लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या चौकडीला अटक; सहा गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 05:54 PM2023-02-01T17:54:39+5:302023-02-01T17:55:33+5:30
कंपनी परिसरातील तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या चार आरोपींच्या चौकडीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे.
नालासोपारा (मंगेश कराळे) - कंपनी परिसरातील तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या चार आरोपींच्या चौकडीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. चारही आरोपीकडून पोलिसांनी सहा गुन्ह्यांची उकल करून ६ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी बुधवारी दिली आहे.
राजीवली येथील राज बिल्डींगमध्ये राहणाऱ्या गनी मेमन (४६) यांच्या ते काम करत असलेल्या टीवरी येथील स्कायलाईट कन्स्ट्रक्शन अँण्ड इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड येथे ५ जानेवारीला रात्री चोरट्यांनी लोखंडी प्लेट, वर्टीकल, लेझर सोलजर, बेस जॅक हे ब्रिज बांधण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ८३ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता.
वालीव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयाचे हद्दिमध्ये कंपनी परिसरातील तसेच चालु बांधकामाच्या ठिकाणी रात्री अपरात्री लोखंडी वस्तुंच्या चोरीच्या गुन्हयांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट दोन मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक आणि गुप्त बातमी दारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आरोपी आसिक खान (४५), अब्दुल खान (४६), मोहम्मद कासिम खान (४९) आणि सज्जनअली रसीद (२६) यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली. त्यांनी वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. तपासा दरम्यान नमुद अटक आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी वालीव ३, पेल्हार २ आणि वसई १ असे सहा गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून गुन्हयातील चोरलेले लोखंडी साहित्य, गुन्हा करणेकरीता वापरलेले वाहन असा एकुण ६ लाख ४७ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे यांनी केली आहे.