जिल्हाभरात लस घेण्यासाठी रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 11:57 PM2021-03-04T23:57:54+5:302021-03-04T23:57:58+5:30

गर्दीला आवरण्यासाठी पाेलिसांना पाचारण : पालघर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

Queues for vaccinations across the district | जिल्हाभरात लस घेण्यासाठी रांग

जिल्हाभरात लस घेण्यासाठी रांग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
पालघर : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यादरम्यान अचानक लाभार्थ्यांमध्ये वाढ झाली. त्यामुळे पालघर ग्रामीण रुग्णालयातील जेजे युनिट लसीकरण केंद्रात बाचाबाचीचे प्रसंग ओढवले. आरोग्य यंत्रणेने यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्याने शेवटी पोलिसांना पाचारण केले. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार २३० लोकांनी पहिला डोस घेतला आहे, तर दुसरा डोस सहा हजार ३६५ लोकांनी घेतला आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये पहिला डोस दोन रुग्णालये मिळून १४७ जणांनी 
घेतली आहे.
१ मार्चपासून संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये कोविड १९ लसीकरण मोहिमेत ६० वर्षांवरील ज्यष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षांदरम्यानच्या दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी आपली नोंद कोविन ॲप, आरोग्य सेतू ॲप किंवा cowin.gov.in वर लॉग इन करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले होते. सुरुवातीला नोंदणीसाठी ॲपमध्ये असलेल्या अडचणीमुळे अनेकांना आपली नोंदणी करता आली नव्हती. मात्र अशा काही अडचणींवर आरोग्य विभागाने मात करून लसीकरण केंद्रामध्ये वाढ केल्याने लसीकरण लाभार्थ्यांमध्ये हळूहळू वाढ होऊ लागली.
पूर्वी सुरुवातीला अॅपद्वारे नोंदणीकृत लाभार्थ्यांनाच लस देण्याच्या स्पष्ट सूचना असताना नेटच्या गोंधळामुळे लसीकरण केंद्रावर नोंदणी (ऑफलाइन) केलेल्या लाभार्थ्यांनाही लस देण्याच्या सूचना शासन पातळीवरून देण्यात आल्या. त्यामुळे दिवसभरात सुमारे २०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या शासन पातळीवरून सूचना असताना आरोग्य विभागाने २०० च्या वर लाभार्थ्यांचे लसीकरण केले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी जातीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असताना पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या जेजे हेल्थ युनिटमध्ये गुरुवारी सकाळी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान लाभार्थ्यांच्या गर्दीत हळूहळू वाढ होऊन मोठी गर्दी जमू लागली. मोलमजुरी करणारे, सेवानिवृत्त आदी सर्वच घटकांतील लाभार्थ्यांची एकच गर्दी जमू लागल्याने बाचाबाचीचे प्रसंग उद्भवले. यावर नियंत्रण मिळवणे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कठीण होऊन बसले. परिणामी, पालघर पोलिसांना पाचारण केल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले.

सर्व लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. दिवसाला २०० ची मर्यादा पार करून आम्ही त्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस देण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. 
- डॉ. दिनकर गावित, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय. पालघर.

Web Title: Queues for vaccinations across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.