चाराेटी टाेलनाक्यावर लागत आहेत वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:43 PM2021-03-01T23:43:31+5:302021-03-01T23:43:52+5:30

फास्टॅग यंत्रणा फेल : चालकांचे कर्मचाऱ्यांसाेबत खटके, प्रशासनाचा गलथान कारभार

Queues of vehicles are forming at Chareti Talnaka | चाराेटी टाेलनाक्यावर लागत आहेत वाहनांच्या रांगा

चाराेटी टाेलनाक्यावर लागत आहेत वाहनांच्या रांगा

googlenewsNext


शशिकांत ठाकूर 
लोकमत न्यूज नेटवर्क 
कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी टोलनाक्यावर फास्टॅग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे टोलनाक्यावर दररोज वाहनाच्या लांबलचक रांगा लागत आहेत. फास्टॅग प्रणाली लागू केल्यानंतरही परिस्थिती बदलली नसल्याने या याेजनेचा उद्देशच सफल न झाल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
१६ फेब्रुवारीपासून संपूर्ण देशात फास्टॅग वापरणे सर्वच वाहनांना बंधनकारक केले आहे. फास्टॅग प्रणाली येण्याच्या  आधी कित्येक वर्षांपासून टोलनाक्यावर रोखीने व्यवहार होत होते. त्यामुळे बराच वेळ वाया जात हाेता. तसेच, सुट्या पैशांवरून वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांत वाद होत हाेता. त्यामुळे टोलनाक्यावर गर्दी होऊन वाहनचालकांचा वेळ आणि वाहनांचे इंधन वाया जात होते. यावर उपाय म्हणून फास्टॅग प्रणालीची यंत्रणा लागू केली. फास्टॅगद्वारे  टोलनाक्यांवरील रांगांतून लवकर मुक्ती मिळेल,  असा सरकारने  दावा केला होता. 
फास्टॅग नसेल तर वाहनचालकांना टोलची दुप्पट  रक्कम भरावी लागत आहे. ही सक्ती सुरू झाल्यानंतर साेमवारी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर चारोटी टोलनाक्यावर सकाळी मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर व संध्याकाळी गुजरात-मुंबई मार्गिकेवर  वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. चारोटी टोलनाक्यावर फास्टॅग स्टिकर स्कॅन न झाल्याने टोल कर्मचारी टोलची दुप्पट रक्कम भरायला सांगतात. त्यामुळे वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. बऱ्याचदा फास्टॅग स्टिकर स्कॅन न झाल्याने रोखीने टोल भरल्यानंतर काही वेळाने टोलची रक्कम फास्टॅगमधून वसूल केल्याचाही  मेसेज वाहनचालकांना येत आहे. त्यामुळे फास्टॅगचा वाहनचालकांनी धसकाच घेतला आहे.

वाहनचालकांकडून 
दुप्पट-तिप्पट वसुली 
nदुप्पट टोल आणि पुन्हा फास्टॅगमधूनही टोलवसुली असा तिप्पट टोल भरावा लागत आहे. अशा त्रुटींमुळे आज टोलनाक्यावर दोन ते तीन किमी रांगा लागल्या हाेत्या. त्यामुळे वाहनचालकांनी विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून मार्ग काढला. 
nया वाहनांच्या गर्दीचा फटका वाहनचालकांबरोबर मोटारसायकलस्वार, रिक्षाचालक व रुग्णवाहिकेलाही बसला  आहे.  बऱ्याचवेळा एक दोन-टोल वसुली मार्गिका बंद असतात. मात्र, टोलचा ठेका असलेली आयआरबी कंपनी या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे. 
nया समस्यांवर आयआरबी कंपनीने तोडगा काढून होणारी गर्दी टाळावी व वाहनचालकांना होणारा मनस्ताप दूर करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

Web Title: Queues of vehicles are forming at Chareti Talnaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.