माणिकपूर पोलीस ठाण्याच्या आवारात राडा, टोळक्याने केला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:14 AM2018-02-15T03:14:30+5:302018-02-15T03:14:38+5:30
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या आवारात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी २० ते २५ जणांच्या टोळक्याने सहा जणांना पोलीस ठाण्याच्या आवारातच मारहाण सुरु केली.
वसई : माणिकपूर पोलीस ठाण्याच्या आवारात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी २० ते २५ जणांच्या टोळक्याने सहा जणांना पोलीस ठाण्याच्या आवारातच मारहाण सुरु केली. ती सोडवण्यासाठी गेलेल्या दोन पोलीसांनाही धक्काबुकी केली. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी एका महिलेसह सात जणांना अटक केली असून १२ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
वसई कोळीवाडा येथे राहणारा शाहीद आसिफ खान याने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यासाठी सतीश शेखर पागे हे दोन पुरुष आणि तीन महिलांना घेऊन मंगळवारी रात्री माणिकपूर पोलीस ठाण्यात आले होते. याची कुणकुण लागताच शाहीद खानने आपल्या सहकाºयांना बोलावून घेतले. १२ मोटार सायकलीवरून २० ते २५ इसम माणिकपूर पोलीस ठाण्यात आले. आपले साथीदार पोलीस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर शाहीदने सतीश पागे आणि त्याच्यासोबत आलेल्या इसमांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यासरशी जमलेल्या जमावानेही गोंधळ घालत सतीश पागेसह त्याच्या सहकाºयांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी ड्युटीवर हजर असलेले पोलीस बनसोडे, महिला पोलीस विघे आणि महिला दक्षता कमिटीच्या सदस्य बिंदू नायर यांनाही धक्काबुकी केली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात अर्धा तास राडा केला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाघव, फलफले, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा लोंढे आणि इतरांनी बळाचा वापर करून हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आक्रमक झाल्याने हल्लेखोरांनी पळ काढला. या राड्यात सहभागी असलेल्या मोहम्मद आशिक खान, इम्तियाज मलिक, मोहम्मद नदीम खान, मेहरुनिस्सा शेख, शहानवाज शेख, मुजीम खान, इमरान अन्सारी या सात जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शाहीद खान आपल्या इतर साथिदारांसह पसार झाला असून पोलिसांनी १२ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. या मोटार सायकली गुन्ह्यात वापरण्यात आल्या असल्याने आरटीओकडून त्यांच्या मालकांची नावे घेतली असून त्यांनाही अटक करण्यात येणार आहे.