रायगडचा मयूर घरत ठरला ‘धर्मवीर श्री २०२०’ चा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:26 AM2020-02-07T00:26:51+5:302020-02-07T00:28:06+5:30
रायगड जिल्ह्याचा मयूर घरत या वर्षीचा ‘धर्मवीर श्री २०२०’ ठरला असून वाड्यातील पी.जे. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत हा किताब पटकावला.
वाडा : रायगड जिल्ह्याचा मयूर घरत या वर्षीचा ‘धर्मवीर श्री २०२०’ ठरला असून वाड्यातील पी.जे. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत हा किताब पटकावला. तर ‘वाडा श्री’ म्हणून वाड्यातील पप्पू नांगरे याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
शिवसेना अंगीकृत चर्मोद्योग कामगार सेना आणि भारतीय माथाडी आणि जनरल कामगार सेना, पालघर डिस्ट्रिक्ट/वेस्टर्न ठाणे बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन, संत रोहिदास शैक्षणिक, सामाजिक क्रीडा संस्था, आणि टायगर ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने ह्यधर्मवीर श्री २०२० शरीरसौष्ठव’ स्पर्धेचे आयोजन बुधवारी येथील पी. जे. हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते.
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील साधारण ८० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. तरुणांना आरोग्याचे महत्त्व समजावे, त्यांच्यात व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने १३ वर्षांपासून आम्ही या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करीत असून दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया चर्मोद्योग कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि स्पर्धेचे आयोजक भरत गायकवाड यांनी दिली.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी टायगर ग्रूपचे मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे, उपतालुका प्रमुख तुषार यादव, शहर प्रमुख नरेश चौधरी, नगराध्यक्षा गीतांजली कोळेकर, महिला आघाडीच्या विक्रमगड विधानसभा संघटक मनाली फोडसे, युवासेनेचे सचिन पाटील आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.