लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरुन राडा, पश्चिम रेल्वेवर संतप्त प्रवाशांचा रेल रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 01:14 PM2018-01-29T13:14:35+5:302018-01-29T13:21:29+5:30
बोईसर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने दोन गटात जोरदार वाद झाला आहे.
पालघर - बोईसर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने दोन गटात जोरदार वाद झाला आहे. नेहमीच लोकलमध्ये बसण्यावरुन होणा-या वादाला वैतागलेल्या काही संतप्त प्रवाशांनी रेल रोको करत आपला राग व्यक्त केला. यामुळे एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेवरील गाड्या आणि लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आणि पश्चिम रेल्वेच्या हजारो प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
सोमवारी (29 जानेवारी) सकाळी बोईसर स्थानकात हा प्रकार घडला. प्रवासी लोकलमध्ये शिरल्यानंतर पासधारक आणि अन्य प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला. एक पुरुष आणि महिला प्रवाशात बसण्याच्या जागेवरून शाब्दिक चकमक उडाली. काही वेळानं अन्य प्रवासीही या भांडणात सहभागी झाले. हे प्रकरण एवढं वाढलं की हाणामारी सुरू झाली. यानंतर काही संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत वांद्रे-भुज पॅसेंजर ट्रेन रोखून धरली व घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे बोईसर रेल्वे स्थानकात काही काळ तणावाचे वातावरण होते.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वांद्रे-भुज एक्स्प्रेस पुढील मार्गाकडे रवाना होऊ शकली. मात्र, प्रवाशांच्या रेलरोकोमुळे पश्चिम रेल्वेवरील एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल तासभर रखडली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस प्रवाशांना तासभर नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, भांडण करणाऱ्या एक पुरुष आणि एका महिला प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.