डहाणूत पावसाचे धूमशान; मानवी साखळीच्या साहाय्याने केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:56 PM2019-09-15T23:56:12+5:302019-09-15T23:56:25+5:30
रविवारी पहाटे पाचपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसाने वीकेंडला आराम करणाऱ्या नागरिकांची झोपच उडवली.
बोर्डी : रविवारी पहाटे पाचपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसाने वीकेंडला आराम करणाऱ्या नागरिकांची झोपच उडवली. पाण्याची तीव्रता अधिक असल्याने शहरासह ग्रामीण क्षेत्रातील सखल भागात पाणी साचले, तर नदी-नाले, ओहळ दुथडी भरून वाहू लागल्याने विविध मार्ग पाण्याखाली गेले. पाऊस थांबल्याने दुपारनंतर स्थिती पूर्वपदावर आली. दरम्यान, दिवसभर विजेचा खेळखंडोबा सुरु होता. डहाणू रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेचा मुख्य रस्ता ते तारपा चौक येथे पाणी साचले. येथून नागरिकांना सुरिक्षत मार्ग काढता यावा म्हणून काही समाजसेवकांनी मानवी साखळी आणि दोरखंडाच्या सहाय्याने मदतीचा हात पुढे केला. हा रस्ता काही काळ वाहतुकीस बंद झाला. पाण्याची तीव्रता वाढल्याने अनेकांनी परगावी जाण्याचा बेत रद्द केला. नारायण बाग, इराणी रोड, कोसबाड मार्गा लगतचा रेल्वेचा कंक्राडी पूल, मुकबधीर शाळा परिसर, कैनाड नाका, सावटा येथील ब्रिज, क्रि डो वर्ल्ड स्कुलकडे जाणारा रस्ता, जकात नाका अशा अनेक भागात पाणी साचले होते. दरम्यान डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांचा शहरात पाणी न तुंबण्याचा दावा फोल ठरल्याने नेटकऱ्यांनी तोंडसुख घेत खिल्ली उडवली.ग्रामीण भागातही पावसाचा जोर अधिक होता. घोलवड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर गुडघाभर पाण्यात होता. महेश मोठे यांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले. त्यामुळे महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली. तर घोलवड ग्रामपंचायतीने राबविलेल्या अनियोजित गटाराच्या विकास कामांमुळे ही आपत्ती ओढवली असून त्याला तालुका प्रशासन जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी मोठे कुटुंबियांनी केली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी ‘आपले सरकार’ या आॅनलाईन अॅपद्वारे केली आहे.
>मुसळधार पावसाने घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले. त्याला ग्रामपंचायत जबाबदार असल्याची तक्र ार आपले सरकार या अॅपवर केली असून कारवाई आवश्यक आहे.
- महेश मोठे, घोलवड ग्रामस्थ