जव्हारमध्ये पावसाचा जोर; बळीराजाला धास्ती
By admin | Published: July 16, 2017 02:17 AM2017-07-16T02:17:33+5:302017-07-16T02:17:33+5:30
जव्हार तालुक्यात गेल्या ३ दिवसांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाचा जोर शनिवारी कायम होता, सकाळी थोडा वेळ उघडीप दिल्यानंतर दुपारपासून त्याने तालुक्याला
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : जव्हार तालुक्यात गेल्या ३ दिवसांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाचा जोर शनिवारी कायम होता, सकाळी थोडा वेळ उघडीप दिल्यानंतर दुपारपासून त्याने तालुक्याला झोडपण्यास सुरवात केली. पावसाची परिस्थिती जैसे थे आहे. शुक्रवारी तालुक्यात १२७ मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली तर आता पर्यत १६३८ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रभारी नायब तहसीलदार प्रताप तारगे यांनी दिली.
बुधवार रात्रीपासून पडणाऱ्या धो-धो पावसामुळे ६८ तासांत सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे, काही वर्षापूर्वीची पुनरावृत्ती जव्हार तालुक्यात झाल्याची चर्चा शहरात असून असा पाऊस मागील काही वर्षापूर्वी पडला होता, जून ७ पासून सुरू होणाऱ्या पावसाची थेट आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यत संततधार या भागात सुरू असायची, सूर्य दर्शनही महिना महिना घडत नव्हते, तशी परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून येथे आहे.
तसेच कमी उंचीच्या रस्त्यांवरील मोऱ्या पावसामुळे भरून ओव्हरफ्लो झाल्याने शेकडो खेडोपाड्यांचा संपर्क काही काळ तुटला होता.
मागील महिन्यात पावसाने चांगलीच हजेरी लावून शेती उपयुक्त वर्षाव केल्यामुळे बळीराजा सुखावला होता, व त्यांनी मोठ्याप्रमाणात शेतात भात, नागली, वरई आदींचा पेरा केला होता. तो संपूर्ण वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे. त्यासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.