बोईसर, तारापुरात पावसाची दमदार हजेरी

By Admin | Published: June 10, 2017 01:03 AM2017-06-10T01:03:15+5:302017-06-10T01:03:15+5:30

पालघर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाने जोर पकडला असून शक्रवारपासून बोईसर, तारापूर भागाला अक्षरश: झोडपून काढले आहे.

Rainy Hazardous rain in Boisar, Taraput | बोईसर, तारापुरात पावसाची दमदार हजेरी

बोईसर, तारापुरात पावसाची दमदार हजेरी

googlenewsNext

पंकज राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : पालघर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाने जोर पकडला असून शक्रवारपासून बोईसर, तारापूर भागाला अक्षरश: झोडपून काढले आहे. सुरुवातीलाच दमदार हजेरी लावलेल्या वरुणराजाने अनेक ठिकाणी नाले व डबके तुडुंब भरले. एका घरावर वृक्ष कोसळल्याने पडझड झाली. तर, मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूककोंडी झाली. तारापूर एमआयडीसीमधील काही भागांमध्ये प्रचंड पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होते. विजेच्या कडकडाटामुळे परिसरात वीज गुल झाली होती.
बोईसर मंडळ क्षेत्रात शुक्रवारी १६४ मिमी, तर तारापूर मंडळ क्षेत्रात १४६.३ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी रात्री पावसाला सुरुवात होताच मध्यरात्रीच्या सुमारास बोईसर शहराची वीज गुल झाली होती. ती पहाटे ४ वाजता परतली. तर, काही भागांत विजेचा सकाळपर्यंत पत्ताच नव्हता. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा आला असला, तरी विजेअभावी पंखे बंद झाल्याने मच्छरांनी अनेकांची झोपमोड केली.
पहिल्याच पावसात शहरातील चाळी असलेल्या भागांत चिखलमय स्थिती होती. येथील शुक्ला कम्पाउंडमध्ये एका घरावर झाड कोसळले, मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, तारापूर-बोईसर या मुख्य आणि प्रचंड वाहतूक असलेल्या रस्त्यावरील भीमनगर येथे वडाचे झाड उभ्या असलेल्या टेम्पोवर पडल्याने टेम्पोचे नुकसान झाले आहे. कोसळलेल्या या झाडामुळे काही तास वाहतूक ठप्प झाली होती. अखेर, जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजूला करून वाहतूक मोकळी करण्यास आली. त्यामुळे काही काळ जनजिवन विस्कळीत होते.
एमआयडीसीच्या ई झोनमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होते. तर, मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याचा निचरा अगदी संथगतीने सुरू होता. त्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना रस्त्यावर भरलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत होते. मात्र, दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी बी पेरणीच्या तयारीला लागल्याचे चित्र होते.

Web Title: Rainy Hazardous rain in Boisar, Taraput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.