पावसाची रात्रभर संततधार, रहिवाशांची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:01 PM2019-07-24T23:01:41+5:302019-07-24T23:02:50+5:30
पुन्हा सर्वत्र पूरस्थिती : नालासोपारा, वसई, विरार परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी, दाद, फिर्याद मागायची तरी कुणाकडे?
नालासोपारा : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने वसई तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळपर्यंत चांगलाच जोर धरल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. मंगळवारी रात्री ६ ते ७ तास पाऊस पडल्याने नालासोपारा, वसई आणि विरार परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने त्यांना जणू नाल्याचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. धो-धो पावसामुळे वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
मंगळवारी सकाळपासूनच अधूनमधून पावसाची रिमझिम सुरुच होती. तालुक्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने धो-धो पावसामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खड्ड्यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकही धिम्या गतीने सुरु होती. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्रीनंतर मुसळधार पाऊस बरसला. बुधवारीही दिवसभर पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने भातरोपे कुजण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. धो-धो पावसामुळे नद्या, तलावे, विहिरी व धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नालासोपारा शहरात तर पूर्वेकडील गाला नगर, शिर्डी नगर, अलकापुरी, सेंट्रल पार्क, आचोळे रोड या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावरून ये-जा करतांना रहिवाशांना व वाहनांना त्रास सहन करावा लागला. तसेच वसई, विरार आणि नायगाव परिसरातील खोलगट भागात पावसाचे पाणी साचले होते. नागरिक पाण्यामधून रस्ता काढत कामावर जात होते तर विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी रस्ता शोधत होते. नालासोपारा पूर्वेकडील काही परिसरात पावसाचे पाणी साचल्याने तसेच गटारांचे घाण पाणीही रस्त्यावर आल्याने नागरिकांना आणि वाहतुकीला त्रास होत होता.
नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, एसटी डेपो रोड, समेळ पाडा, चक्र ेश्वर तलाव, सोपारा, गास, सनसिटी रस्ता, उमराळे, नाळे या परिसरात पावसाचे पाणी साचले होते.वसईतील नाल्यांची साफसफाई महानगरपालिकेने कागदावरच केल्याने हे झाले.
महानगरपालिकेची यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप....
गटारे साफ केली म्हणून महानगरपालिकेने गवगवा केला होता. पण पाऊस पडला की सखल भागात पाणी साचते त्या परिसरात सक्शन पंप का लावत नाही? सक्शन पंप पण महानगरपालिकेने विकले की काय असा सवाल नागरिकांनी केला आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा आपत्कालीन यंत्रणेचा अधिकारीही फिरकला नसल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.