ग्रामीण महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:25 PM2020-01-11T23:25:41+5:302020-01-11T23:25:49+5:30
आदिवासी महिलांना जोडव्यवसायाची संधी
रवींद्र साळवे
मोखाडा : निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. यामुळे शेतीला जोड व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उत्पादित मालावर प्रक्रि या करून विक्री करता यावी या दृष्टीने महिला बचत गटांना कुकुटपालन या जोड व्यवसायाच्या माध्यमातून प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मोखाडा तालुक्यातील कुर्लोद, बोटोशी, आसे येथील अल्पभूधारक व भूमिहीन सहा महिला बचत गटातील ६० महिलांना कुक्कटपालन व्यवसायासाठी प्रत्येकी गटाला १०० कोंबड्या देण्यात आल्या असून सहा गटांना ६०० कोंबड्या देण्यात आल्या आहेत.
या दोन महिन्याच्या कोंबड्यांना ठेवण्यासाठी पिंजरा तसेच दोन महिने पुरेल एवढे खाद्य देण्यात आले, सोबतच व्यवस्थापन करण्यासाठी गटातील सदस्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले. या व्यवसायाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना अंडे विक्र ी करून आर्थिक उत्पादनासोबतच आपल्या मुलांना सकस आहार देण्यासाठी देखील मदत होणार तसेच या गटांना अमृत आहार योजनेसोबत जोडण्याचा मानस असून त्याद्वारे गावातच बाजारपेठ उपलब्ध होईल व मुलांना देखील चांगल्या दर्जाची अंडी उपलब्ध होतील, असे आरोहण संस्थेचे पदाधिकारी गणेश सरोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आदिवासींना फायदेशीर जोडधंदा मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या तत्त्वावर रोजगार हमी योजना कार्यरत आहे, परंतु मागेल त्याला कामही मिळते आणि दाम देखील मिळत नाही, अशी रोजगार हमी योजनेची अवस्था आहे. यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव स्थलांतरित होत असतो, परंतु आरोहण संस्थेने बचत गटातील आदिवासी महिलांना कुक्कुटपालनाच्या माध्यमातून मोफत आणि फायदेशीर जोडधंदा उपलब्ध करून दिल्याने आरोहण संस्थेचा हा उपक्र म कौतुकास्पद मानला जात आहे.