पालघरमधील वाढलेले मतदार कुणापाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:11 AM2019-04-26T00:11:38+5:302019-04-26T00:12:01+5:30
दीड लाखाची वाढ ठरणार निकाल फिरवणारी
- हितेन नाईक
पालघर : पालघर लोकसभेच्या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात असून २०१८ साली झालेल्या पोटनिवडणुकीच्या तुलनेत ८.९ टक्क्यानी मतांच्या टक्क्यात म्हणजेच १ लाख ५४ हजार २२० मतांची वाढ झालेली असून या वाढलेल्या मतदार टक्क्यांचा फायदा नेमका कोण उठवणार यावर उमेदवारांच्या विजयाचे गणित ठरणार आहे.
पालघर लोकसभेचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार असून एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. ह्यात ७ उमेदवार राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असून ५ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. पालघर लोकसभेची २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एकूण १७ लाख ३१ हजार ७७ मतदार होते. तर आता झालेल्या नवीन मतदारांच्या नोंदणी नंतर १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांची नोंद झाल्याची माहिती निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे १ लाख ५४ हजार २२० नवीन मतदारांची नोंद करण्यात आलेली आहे.
२०१८ च्या पोट निवडणुकीत भाजप कडून राजेंद्र गावित (२ लाख ७२ हजार ७८२ मते), शिवसेनेचे श्रीनिवास वणगा यांना (२ लाख ४३ हजार २१० मते) तर बहुजन विकास आघाडी चे उमेदवार बळीराम जाधव यांना (२ लाख २२ हजार ८३८ मते) मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि सेना एकत्र लढत असून त्यांची मतांची बेरीज ५ लाख १५ हजार ९९२ इतकी भरत असून बविआ च्या उमेदवारा दरम्यान ची तफावत पाहता ती २ लाख ९३ हजार १५४ इतकी भरते. भाजप-शिवसेना महायुतीची पालघर,अर्धे बोईसर,डहाणू,विक्र मगड विधानसभेमध्ये मोठी ताकद असून २०१८ च्या पोट निवडणुकीत सेना-भाजप च्या दोन्ही उमेदवाराला एकूण ३ लाख ९७ हजार ९३२ मते मिळाली होती तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव ह्यांना अवघी ७९ हजार २२३ मते मिळाली होती.त्यामुळे ३ लाख १८ हजार ७४९ मतांचा मोठा फरक दोन्ही उमेदवारांच्या दरम्यान होता. बविआ चा बालेकिल्ला असणाऱ्या वसई व नालासोपारा या विधानसभा क्षेत्रात युतीच्या दोन्ही उमेदवारांना १ लाख १८ हजार ०५४ मते तर बविआ उमेदवाराला १ लाख ४३ हजार ६१२ मते पडली होती. यात फक्त २५ हजार ५५८ हजाराच्या मतांचा फरक असल्याचे दिसून येत आहे.
८२ हजारांचा फरक युती-आघाडीची चुरस
वर्ष २०१९ मध्ये नव्याने मतदान नोंदणी मध्ये वाढलेल्या १ लाख ५४ हजार २२० मतदारा पैकी १ लाख १९ हजार ४१७ एवढे मतदार हे बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असलेल्या बोईसर, नालासोपारा व वसई या विधानसभा मतदार संघात वाढले असून पालघर, डहाणू आणि विक्र मगड या महायुतीचे आमदार असलेल्या विधानसभा मतदार संघात फक्त ४८ हजार ८७४ नवीन मतदारांची वाढ झालेली आहे.त्यामुळे साधारण पणे ८२ हजार मतांचा फरक दोन्ही उमेदवारांमध्ये दिसून येत असल्याने हा फरक भरून काढण्यासाठी बविआ कामाला लागली आहे.तर जास्तीत जास्त मतदारांना महायुती कडे वळविण्या साठी महायुतीच्या मातब्बरांच्या प्रचार सभा सुरु आहेत.