...तर बुलेट ट्रेनचे रूळ उखडा, राज ठाकरे कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 03:01 AM2018-05-02T03:01:34+5:302018-05-02T03:02:21+5:30
बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस हायवे या प्रकल्पांसाठी आपली जमीन देऊ नका, बळजबरी करून जर बुलेटट्रेन उभारली तर तिचे रुळ उखडून टाका असा जहाल सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसई येथील विराट सभेत दिला.
वसई/पालघर : बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस हायवे या प्रकल्पांसाठी आपली जमीन देऊ नका, बळजबरी करून जर बुलेटट्रेन उभारली तर तिचे रुळ उखडून टाका असा जहाल सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसई येथील विराट सभेत दिला.
ते पुढे म्हणाले की, नाणार येथील रिफायनरीचा प्रकल्प होणार हे सहा महिन्यापूर्वी ज्ञात झाले. कोकणच्या भूमीपुत्रांना त्या आधी त्याची गंधवार्ताही नव्हती. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या जमीनी प्रचंड प्रमाणात परप्रांतीयांनी खरेदी केल्या. या जमीनी घेणारे कोण होते? याची यादी त्यांनी दाखविली. ती सगळी गुजराती मंडळी होती. याचा अर्थ प्रकल्प होणार हे भूमीपुत्रांना कळत नाही. परंतु उपऱ्यांना मात्र काही वर्षे आधी कळते. हे महाराष्टÑ विरोधी कारस्थान आहे असा दावा त्यांनी केला.
भारतामध्ये इतर राज्यातील विस्थापितांचे लोंढे सर्वाधिक प्रमाणात महाराष्टÑात येतात आणि त्यातही सर्वाधिक विस्थापीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात येतात. त्यामुळेच अनधिकृत चाळी प्रचंड प्रमाणात उभारल्या जातात असा दावा त्यांनी केला.
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर चाल करून गेले तेव्हा औरंगजेबाचा तेथील सरदार पळून गेला. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचा एक साधा अधिकारी त्याने सुरत वाचविण्याचे प्रयत्न केला. जेव्हा औरंगजेबाने आपला सरदार माहताब खान याला सुरतेत पाठविले. तेव्हा त्याला कळाले बादशहांचा सरदार पळून गेला आणि सुरतेला वाचविण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनीच्या एका साध्या अधिकाºयाने केले. तो त्याला भेटला आणि त्याने त्याला हिरे रत्नजडीत सोन्याची तलवार बक्षिस दिली. ती त्याने नाकारली, मी माझे काम केले. त्याचे मला कोणतेही बक्षिस नको असे त्याने सांगितले. तेव्हा ही भेट साक्षात बादशहांनी तुला पाठविली आहे, असे समजून तू तिचा स्वीकार कर. असे सांगितले असता या अधिकाºयाने जे उत्तर दिले ते आपल्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. तो म्हणाला बादशहा जर माझ्यावर एवढे खूश असतील तर त्यांनी माझ्या कंपनीला संपूर्ण भारतात व्यवसाय करताना सर्व करातून पन्नास टक्के सूट द्यावी. पहा, याला म्हणतात राष्टÑभक्ती. माझा देश, त्याचे हितसंबंध त्याला सर्वोच्च प्राधान्य अशी ज्वलंत अस्मिता महाराष्टÑाबाबत जेव्हा मराठी बांधवांच्या मनात जागेल तेव्हा महाराष्टÑाचा विकास होईल, कल्याण होईल, भले होईल. सध्या आपल कुंपणच शेत खातयं मराठी अधिकारीच अवैध बांधकामांकडे डोळेझाक करीत आहेत. भूमीपुत्रच मातीमोल दराने जमीनी विकत आहेत. अशा स्थितीत महाराष्टÑ पुढे जाणार कसा? असा सवाल त्यांनी केला. गुजरातमध्ये असा कायदा आहे की, कुठल्याही प्रकारची बदली कोणत्याही कंपनी, खात्यात करायची असेल तर ८५ टक्के नियुक्त्या या स्थानिकांच्याच कराव्या लागतात आणि हिच मागणी आम्ही केली तर आम्ही देशद्रोही ठरता असे, ते म्हणाले.