राजस्थानच्या लग्नवारीने कोरोना रुग्णांमध्ये वाढ, आणखी २२ जण बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 09:28 AM2021-03-17T09:28:39+5:302021-03-17T09:29:28+5:30
जयपूर येथे विमानाने गेलेल्या १८० वऱ्हाडींपैकी प्रथम तीन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात आढळून आले होते.
पालघर : पालघर पूर्वेकडील बिल्डर कीर्ती बाफना यांच्या मुलाच्या लग्नासाठीराजस्थानमधील जयपूर येथे विमानाने गेलेल्या वऱ्हाड्यांच्या बाधित संख्येत वाढ झाली आहे. या वऱ्हाड्यांपैकी एकूण २२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
जयपूर येथे विमानाने गेलेल्या १८० वऱ्हाडींपैकी प्रथम तीन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वर पित्याला सर्व वऱ्हाड्यांची कोरोना तपासणी करून घेण्याच्या आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता. पालघर तालुक्यातील डॉक्टर, वकील, बिल्डर, कारखानदार, मोठे व्यावसायिक, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आदी १८० हून अधिक जण ८ व ९ मार्च रोजी जयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला गेले होते. विवाह आटोपून हे सर्व जण १० मार्च रोजी पालघरला परतल्यानंतर त्यापैकी तीन जणांना कोरोना बाधा झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे उर्वरित सर्वांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्यानुसार १३ मार्च रोजी ४७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ७ जणाना संसर्ग झाल्याचा अहवाल आला आहे, तर दि. १५ मार्च रोजी ५६ जणांची चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला असून त्यामध्ये १२ जणांना लागण झाल्याचा अहवाल आला आहे. या लग्नकार्यात उपस्थित असलेल्यांपैकी एकूण २२ जण बाधित आढळले आहेत.
कुटुंबीयांचीही चाचणी
राजस्थानला लग्नासाठी गेलेल्या उर्वरित ७७ जणांची आणि पॉझिटिव्ह आलेल्यांच्या कुटुंबीयांची चाचणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान, बाधित आलेल्यांच्या नातलगांनी विवाह समारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.