वाढवण बंदराला आपला विरोध कायम- राजेंद्र गावित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:08 AM2019-09-17T00:08:38+5:302019-09-17T00:09:02+5:30
तालुक्यातील वादग्रस्त ठरलेल्या वाढवण बंदराला माझा यापुढेही विरोध कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी डहाणूत मांडली.
डहाणू : तालुक्यातील वादग्रस्त ठरलेल्या वाढवण बंदराला माझा यापुढेही विरोध कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी डहाणूत मांडली. ‘खासदार आपल्या दारी’ या कार्यक्र मात आयोजित जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जनतेच्या वेगवेगळ्या समस्या जाणून घेत त्यांनी त्याची समाधानकारक उत्तरे दिली.
मसोली येथील दशाश्री माळी वाणीक समाज सभागृहात हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील वाढवण बंदराला विरोध केल्याने आमची भूमिका स्पष्ट असल्याचे मत त्यांनी मांडले. वाढवण बंदर झाल्यास बुलडोझरखाली जाण्याची तयारी दर्शवणाऱ्या गावितांनी बुलडोझर येणारच नाही, त्यामुळे त्याखाली जाण्याचा प्रश्नच नाही, असे देखील सांगितले. यावेळी वाढवण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील व मच्छीमार नेते अशोक गंभीरे यांनी पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बचाव समितीच्यावतीने एक निवेदनही दिले.
तालुक्यातील चिकू उत्पादक शेतकऱ्यांसाठी, बागायतदारांसाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करून जिल्ह्यात चिकू संशोधन केंद्र सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावर्षी नुकसान झाले असून निरीच्या चौकशी अहवालानुसार भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी तालुक्यातील चिकू बागायतदार उत्पादक यांनी देखील निवेदन दिले.
डहाणू नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी गावितांसमोर अनेक समस्यांचा पाढा वाचला. या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मच्छीमाराना नुकसानभरपाई देण्यासाठी केंद्रीय मंत्र्याची भेट घेतली जाईल. रस्ते, वीज, आरोग्य याबाबतीत जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. वसई, नालासोपारा, विरार, पालघर आणि डहाणू पर्यंतच्या उपनगरीय रेल्वे सेवा, रेल्वे स्थानकात सरकते जीने, उड्डाणपूल तसेच काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकात थांबे दिल्याचे त्यांनी सांगितले. खानदेश एक्स्प्रेसला डहाणूत थांबा मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रांत अधिकारी सौरभ कटियार, तहसीलदार राहुल सारंग, वनविभाग, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, शिवसेनेचे लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, उपजिल्हा प्रमुख संतोष शेट्टी, तालुका प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, सेनेचे पदाधिकारी, मच्छीमार समाज कार्यकर्ते, आदी मान्यवर उपस्थित होते.
>पालघर विधानसभा आ. अमित घोडा यांनी या जनसंवाद मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे घोडा यांच्या अनुपस्थितीची उलटसुलट चर्चा शिवसैनिकांत रंगल्याचे दिसून आले.