नरेशचा मृत्यू पोलिसी अत्याचाराने ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:45 PM2018-10-21T23:45:05+5:302018-10-21T23:45:11+5:30
३५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याने ही आत्महत्या नसून पोलीसी अत्याचारात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
पालघर : पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या कोकनेर या ग्रामपंचायत हद्दीतील राईपाडा येथील नरेश पागी या ३५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याने ही आत्महत्या नसून पोलीसी अत्याचारात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
एका संशयास्पद प्रकरणाच्या चौकशी साठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नरेशच्या घरी शुक्रवारी आले होते. त्याच्या घराची झडती घेतल्या नंतर त्याला पोलिस ठाण्यात हजर राहण्यास फर्मावले होते. त्याप्रमाणे नरेशचा मामा रघुनाथ व त्याचा लहान भाऊ कैलास यांना सोबत घेऊन नरेश बोईसर येथील पोलीस ठाण्यात गेला होता. तिथे त्याला चौकशीच्या नावाखाली एका खोलीत डांबवून ठेवण्यात आल्याचे त्याचे मामा रघुनाथ यांनी पत्रकारांना सांगितले. नंतर मामा व भावाला पोलिसठाण्यात बसवून ठेऊन त्याला पोलिसांनी चौकशीसाठी त्याच्या मामाच्या गावी गुंदले येथे नेले. सायंकाळी पोलीस आले तेव्हा नरेश त्याच्या बरोबर न दिसल्याने त्यांनी नरेशबाबत विचारणा केली असता तो आमच्या तावडीतून निसटून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी कोणतेही कागदपत्रे वाचून न दाखवता जबरदस्तीने मामा व भावाच्या सह्या काही कागदांवर घेऊन या दोघाना घरी जाण्यास सांगितले. घराच्यांनी त्याचा शोध घेऊनही त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. रविवारी एका झाडाला नरेशचा मृतदेह लटकत असल्याचे कळताच आम्हाला धक्काच बसला असे त्याच्या मामांनी पत्रकारांना सांगितले व त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला.
>एका संशयास्पद प्रकरणातील तपासा साठी आम्ही नरेश ला ताब्यात घेतले होते.त्याची चौकशी केल्यानंतर आम्ही त्याला सोडून दिले.
- विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर