राजनाथ सिंह आज नालासोपाऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:08 PM2019-04-23T23:08:51+5:302019-04-23T23:09:12+5:30
उत्तर भारतीय मतांसाठी राजनाथ सिंह यांची सभा
नालासोपारा : सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालघर लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांची सभा नालासोपारा पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क मैदानात बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास होणार आहे.
नालासोपारा शहरात १९, २२ व नंतर २४ एप्रिलला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभा घेणार असल्याची चर्चा होती परंतु त्यांची सभा रद्द झाली असून त्या ऐवजी राजनाथ सिंह हे सभा घेणार आहे. ४ वाजण्याच्या सुमारास सिंह यांचे हेलिकॅप्टर एव्हरशाईन येथील मधूबन येथे उतरविण्यात येणार असून तेथून त्यांचा गाड्यांचा ताफा सेन्ट्रल पार्क मैदानात पोहचणार आहे. नालासोपारा विधानसभा क्षेत्र खूप मोठा असून ४ लाख ९७ हजार मतदार या विभागात असून एकुण मतदानाच्या २२ टक्के येवढा हा आकडा आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या जाहीर सभेच्या ठिकाणी बुधवारी सकाळी बॉम्बशोध पथक आणि डॉग स्कॉडकरून स्टेज आणि आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली जाणार आहे. यानंतर पालघर पोलिसांकडून पोलीस अधीक्षक गौरव सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, ४ पोलीस उपअधीक्षक, ५० पोलीस अधिकारी ज्यामध्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ५०० पोलीस कर्मचारी आणि आरसीपीच्या ३ टीम असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.